स्थैर्य, सातारा, दि. ३ : ज्याच्या येण्याने सारे वातावरण प्रसन्न होते, आनंदाचे वारे वाहू लागतात, त्या विघ्नहर्त्याच्या आगमनास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. कुंभारवाड्यात मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहेत तर शहरात ठिकठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी शहरात खूप लवकर स्टॉल्स लागल्यामुळे मूर्तीची निवड करण्यासाठी नागरिकांना मोठा अवधी मिळणार असला तरी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मंदीचे सावट असल्याने या उत्सवावर कोरोनाचे सावट घोंगावणार आहे.
किमान महिना आधीच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. महाराष्ट्रासह परदेशातही सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भक्तगण आतुरलेले असतात. महाराष्ट्राप्रमाणेच परदेशातही मोठ्या भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो; परंतु यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाच्या साथीचे गदड ढग घोंगावत आहेत. हा उत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. मुर्तीची उंची, प्रतिष्ठापणा, गणेश आरती, पुजा आणि विसर्जन या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांना अनेक बंधने पाळावी लागणार आहेत.