सामाजिक सलोख्यासाठी गांधींची शिकवण आवश्यक – किशोर बेडकिहाळ


स्थैर्य, सातारा, दि. 2 ऑक्टोबर : सत्य आणि अहिंसेची महात्मा गांधीजींची शिकवण आज समाजाच्या शांतता आणि सलोख्यासाठी आवश्यक आहेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री जयंती च्या पार्श्वभूमीवर लेक लाडकी अभियान व मुक्तांगण परिवाराच्या वतीने ’गांधी समजून घेताना’ या विषयावरील एक दिवसीय कृतिशील शिबीर आज मुक्तांगण येथे झाले. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

किशोर बेडकिहाळ पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या बद्दलचा द्वेष समजात गतीने पसरवला जात आहे. ऐतिहासिक घटनांचा चुकीचा संदर्भ समाजापुढे मांडला जात आहे. या परिस्थितीत ऐतिहासिक सत्य लोकांसमोर मांडणे हीच सध्याची गरज आहे. याकामी तरुणांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचाराचा अपप्रचार रोखण्यासाठी अभ्यास करून पुढाकार घ्यावा.
अ‍ॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, अशा उपक्रमांमधून गांधींचा विचार जास्त दृढ होईल. तरुण पिढीने गांधी विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.

यावेळी राजीव मुळे लिखित आणि कैलास जाधव दिग्दर्शित, दलित महिला विकास मंडळाची प्रस्तुती असलेला ’ हक्क ’ हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. मुलींचे ’माझ्या शरीरावर माझा अधिकार’ हे पथनाट्य सादर करण्यात आले. सामाजिक चळवळीतील गीते नव्या स्वरूपात एआय च्या माध्यमातून कैलास जाधव यांनी तयार केली आहेत. ही गाणी यू ट्यूब वर अपलोड करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना किशोर बेडकीहाळ यांनी समर्पक उत्तरे दिली. हुबेहूब गांधीजींच्या वेशात असणारे अनिल मोहिते यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बरोबरच प्राध्यापकांची देखील झुंबड उडाली होती.

ज्येष्ठ कार्यकर्ते मिनाज सैय्यद, संजीव बोंडे, दलित महिला विकास मंडळाच्या अध्यक्ष ड. शैला जाधव, प्रणव पवार, स्वाती बल्लाळ, सिंधुताई कांबळे, मालताताई जावळे, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, गौरीशंकर कॉलेज, अरविंद गवळी कॉलेज, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, क्रांती स्मृती अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!