
स्थैर्य, विडणी, दि. २८ सप्टेंबर : “विडणी गावातील अनेकांचे संसार खासगी सावकारीच्या कर्जामुळे उद्ध्वस्त होत होते. गरजू लोक आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, याच हेतूने कै. कृष्णराव केदारी अभंग उर्फ गांधी आण्णा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २०१८ साली स्थापना करण्यात आली,” असे मत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग यांनी व्यक्त केले.
कै. कृष्णराव केदारी अभंग उर्फ गांधी आण्णा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेचे आयोजन उत्तरेश्वर मंदिरात करण्यात आले होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन संतोष अभंग, व्हाईस चेअरमन मंगेश शेंडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धीरज अभंग पुढे म्हणाले की, “पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत गरजू लोकांना, व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना आतापर्यंत २ कोटी ६६ लाख ९३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ८ कोटींच्या वर गेली आहे.” यावेळी त्यांनी कर्जदारांना वेळेत कर्ज भरून संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी जगन्नाथ अभंग, किसनराव टिळेकर, प्रा. विजय अभंग, प्रा. राजेंद्र मोरे आदींनीही संस्थेच्या कामकाजाविषयी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपप्रज्वलनाने झाले. मॅनेजर टी. डी. काळूखे यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन अभंग यांनी, तर आभार विजय अभंग यांनी मानले.