गणपतराव देशमुख, डॉ गेल ऑम्वेट, जयंत पवार यांचे शोषणविरोधी, जातीअंताच्या चळवळीतील योगदान मोलाचे – ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । सातारा । शोषणविरोधी लढ्यातील व जातिअंताच्या चळवळीतील योगदान देणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्लेट , माजी मंत्री व शेकापचे नेते गणपतराव देशमुख ,कॉ. विलास सोनवणे , ज्येष्ठ नाटककार व समीक्षक जयंत पवार व कामगार नेते कॉ. सी पी कुलकर्णी यांचे योगदान मोलाचे आहे व हे या नेत्यांच्या कामातील समान सूत्र आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले. सातारा येथील सुटा संघटनेच्या सभागृहात परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने माजी मंत्री गणपतराव देशमुख , ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट , साम्यवादी नेते विलास सोनावणे , नाटककार व समीक्षक जयंत पवार , विमा कामगार संघटनेचे नेते सी.पी. कुलकर्णी , सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांना एकत्रितपणे अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत दिनकर झिंब्रे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ भास्करराव कदम होते. या दिवंगत नेत्यांनी समाज बदलासाठी जे जे आवश्यक होते ते ते आपापल्या पद्धतीने केले हे त्यांचे मोठेपण आहे. डॉ गेल ऑम्वेट या तर अमेरिकेसारख्या भांडवलशाहीच्या पुरस्कर्त्या देशांमधून येऊन आणि भारतीय नागरिकत्व स्वीकारून कष्टकरी चळवळीत आपले सहचारी व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्याबरोबर सातत्याने आपले योगदान दिले हे त्यांचे मोठेपण भारत देश कदापीही विसरणार नाही. त्यांनी केलेले संशोधन विसरुच शकत नाही असे प्रा अजित साळुंखे यांनी सांगितले. एकाच पक्षातून , एकाच विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व सलग ५२ वर्षे करून आपल्या शेतकरी कामगार पक्ष यावरील निष्ठेचे उदाहरण घालून देणारे माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संघर्षाची लाल मशाल हरपली असेच म्हणावे लागेल असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके यांनी केले. आपल्या नाटकांच्या माध्यमातून मध्यमवर्गीय तसेच गिरणी कामगारांच्या दुःखांना वाट मोकळी करून देणारा वास्तवाशी भिडणारा नाटककार म्हणून जयंत पवार यांची ओळख आहे व ती कायम राहील असेही प्रतिपादन विजय मांडके यांनी केले यावेळी , श्रमिक मुक्ती दलाचे एडवोकेट शरद जांभळे , लाल निशाण पक्षाचे विजय निकम यांचेही भाषण झाले सुरुवातीला विजय मांडके यांनी सर्व निधन झालेल्यांची माहिती उपस्थितांना दिली यावेळी सर्वांनी उभे राहून या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहिली. यावेळी प्रा.सुनील गायकवाड , पत्रकार अरुण जावळे , प्रकाश खटावकर , विजय निकम , मिनाज सय्यद , जयंत उथळे, दिलीप भोसले , मिलिंद पवार , अनिल मोहिते यांच्यासह अनेक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!