गॅलेक्सी सोसायटीला आता ‘मल्टिस्टेट मल्टिपर्पज’ दर्जा; कार्यक्षेत्र विस्तारले

केंद्र शासनाच्या सहकार विभागाची मान्यता; महाराष्ट्र व कर्नाटकात शाखा विस्तार करणार


स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : के. बी. उद्योग समूहाचा भाग असलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या यशस्वी वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून संस्थेला ‘मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ म्हणून अधिकृत मान्यता मिळाली असून, त्यामुळे संस्थेचे कार्यक्षेत्र आता महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांमध्येही विस्तारणार आहे.

सध्या संस्थेचे १०,००० पेक्षा जास्त सभासद असून, ठेवी ४९ कोटी तर कर्जवाटप ३९ कोटी रुपयांचे आहे. संस्थेने सलग चार वर्षे ‘बँको ब्ल्यू रिबिन’ पुरस्कार पटकावला असून, सातत्याने ‘ऑडिट वर्ग अ’ दर्जा कायम राखला आहे. संस्थेचा एन.पी.ए. १ टक्क्यापेक्षा कमी आहे, हे विशेष.

या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संस्थापक व चेअरमन सचिन यादव म्हणाले की, “आमचा उद्देश केवळ आर्थिक सेवा देणे नसून, प्रत्येक सभासदाचा सर्वांगीण विकास घडवणे हा आहे.” “मल्टिपर्पज स्वरूपामुळे आता नव्या उद्योगांची निर्मिती आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या नव्या मान्यतेमुळे गॅलेक्सी संस्था लवकरच बारामती येथे नवीन शाखा सुरू करणार असून, आगामी काळात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाखा विस्तार करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.


Back to top button
Don`t copy text!