दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । सातारा । महाराष्ट्र विचार साहित्य संसदेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा ’मूकनायक पत्रकारिता पुरस्कार’ अभ्यासू पत्रकार गजानन चेणगे यांना घोषित करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पाच हजार रुपये रोख आणि संविधान असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती महाराष्ट्र विचार साहित्य संसदेचे अध्यक्ष अरुण जावळे व कार्याध्यक्ष चेतन शिंदे यांनी दिली.
सर्वहारा वर्गाच्या न्याय व हक्कांची लढाई यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ’मूकनायक’ वर्तमानपत्र सुरू केले या घटनेच्या शताब्दी वर्षपूर्तीपासून महाराष्ट्र विचार साहित्य संसदेने ’मूकनायक’ पुरस्कार देण्याचे योजिले. पहिला पुरस्कार हा पत्रकार मोहन मस्कर – पाटील यांना घोषित केला होता. तथापि कोरोनामुळे हा वितरण सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे या दोन्ही पुरस्कारांचे वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभूमीवर मानवमुक्तीचा लढा पेटवला. ’मूकनायक’ हा या लढ्याचा धगधगता अंगार बनून मुक्या समाजाला ’आवाज’ देत राहिला. खरंतर प्रस्थापित व्यवस्थेने हजारो वर्षे दाबून टाकलेला शोषितांचा आवाज मूकनायकमूळे सर्वहारा वर्गाला मिळाला. मूकनायकनंतर बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुध्द भारत अशी नियतकालिके चालवून डॉ. आंबेडकरांनी भारताच्या सांस्कृतिक – सामाजिक परिप्रेक्षात क्रांतदर्शी चर्चा घडवून आणली. डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेला समाजोध्दाराचे पर्यायाने राष्ट्रोध्दाराचे अधिष्ठान होते. या आणि अशा एकूणच विचारसुत्राला अनुसरून आज जे पत्रकार राबताहेत किंबहुना मानवी उन्नयनाच्या चळवळीसाठी आपली लेखणी झिजवताहेत, समता, स्वातंत्र्य, न्याय, निती विज्ञाननिष्ठा या पंचशिलासाठी झटताहेत अशा पत्रकारांना मूकनायक हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे.
गजानन चेणगे यांनी कृषी, सहकार यासह पाझर तलाव, गडकिल्ल्यांचे संवर्धन, झोपडपट्यांचे पूनर्वसन अशा अनेकविध विषयावर पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचे दखलपात्र काम केले आहे. प्रभातीचे रंग हे चेणगे यांचे एक पुस्तकही आहे. ते स्वतः उत्तम पत्रकार असून विवेकवादी, चिकित्सावादी, विज्ञानवादी साहित्यमूल्यांविषयी त्यांना नितांत आदर आहे. त्यांच्या जीवननिष्ठा, विचारदृष्टी ही परिवर्तनवादी आहे. त्यामुळे महाराष्ट्र विचार साहित्य संसदेला मार्गदर्शन करणारे किरण बनसोडे (सोलापूर), संजय भालेराव (मुंबई), संदेश पवार (रत्नागिरी), ड. विश्वास काश्यप (पुणे), इ. झेड. खोब्रागडे (नागपूर), डॉ. विलास जोंधळे (औरंगाबाद) यांनी चेणगे यांची मूकनायक पत्रकारिता पूरस्कारासाठी निवड केलीय. हा पुरस्कार प्रदान सोहळा समारंभपूर्वक पार पडणार असून लवकरच वेळ आणि ठिकाण जाहीर केले जाईल असे अरुण जावळे व चेतन शिंदे यांनी म्हटले आहे.