एलसीबीची कारवाई : 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्थैर्य, सातारा, दि. 14 : येथील करंजे नाका येथे एलसीबीच्या पथकाने महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या तारा चोरणार्यास जेरबंद केले. त्याच्याकडून 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महावितरणचे ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारा चोरणारा संशयीत सैदापूर फाटा येथे चोरीचे साहित्य विकायला येणार असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोनि सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोनि सर्जेराव पाटील यांनी सुचना दिल्यानंतर सपोनि आनंदसिंग साबळे यांचे पथक करंजे नाका येथे पेट्रोलिंग करत होते. यावेळी एकजण संशयीतरित्या म्हसवे बाजुकडुन मोटार सायकलला पॉलिथीनची पोती बांधून आलेला दिसला. पोलीस पथकास संशय आल्याने त्यास जागीच पकडुन पोत्यामध्ये काय आहे ते पाहिले असता, ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व तांब्याच्या रिंगा मिळून आल्या. याबाबत विचारपुस करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता या तांब्याच्या तारा व रिंगा कण्हेर गावच्या हद्दीत वेण्णा नदीजवळील डीपी, साबळेवाडी येथील इंगळेचा बोगदा येथील डी. पी. आणि म्हसवे येथे एस्सार पेट्रोल पंपाममध्ये ठेवलेला डी.पी. अशा ठिकाणवरुन चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास अटक करून तांब्याच्या तारा व रिंगा असा एकुण 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या तिन्ही चोर्यांप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सातारा तालुका पोलीस स्टेशनला सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंह साबळे, सहाय्यक फौजदार ज्योतीराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, पो.ना. संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, चालक विजय सावंत यांनी केली.