स्थैर्य, खंडाळा, दि.२७: शिरवळ, ता. खंडाळा येथील भरचौकात दुचाकी चोरास शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. याप्रकरणी ज्ञानेश्वर बाजीराव ढमाळ (वय 40, असवली ता.खंडाळा) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ, ता. खंडाळा येथील शहाजी चौकात असणार्या एका कापडाच्या दुकानालगत विठ्ठल गोविंद नेवसे यांनी त्यांच्या मालकीची तीस हजार किंमतीची दुचाकी (क्र.एमएच-11-एआर-8653) लावलेली होती. दरम्यान, ज्ञानेश्वर बाजीराव ढमाळ याने भरदिवसा लावलेली दुचाकी चोरुन नेली होती. ही घटना शिरवळ परिसरामध्ये लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या घटनेची फिर्याद विठ्ठल नेवसे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिल्यानंतर शिरवळ पोलीस चोरट्याचा शोध घेत होते. दरम्यान, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस हवालदार रवींद्र कदम, जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, प्रशांत वाघमारे, स्वप्नील दौंड यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुचाकी ही असवली येथील ज्ञानेश्वर ढमाळ याने चोरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित दुचाकी घेऊन ज्ञानेश्वर ढमाळ हा शिरवळ याठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरवळ येथे पोलीसांनी सापळा लावला असता ज्ञानेश्वर ढमाळ हा सापळ्यात दुचाकीसह अडकला. यावेळी शिरवळ पोलिसांनी दुचाकी चोरटा ज्ञानेश्वर ढमाळ याला अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे हे करीत आहे.