
दैनिक स्थैर्य । 18 मार्च 2025। सातारा । विविध क्षेत्रांमधील तब्बल 7200 मान्यवरांच्या मुलाखती घेऊन, त्यांना बोलते करणारे नामवंत मुलाखतकार आणि निवेदक सुधीर गाडगीळ यांचीच मुलाखत सातारा येथील शाहू कलामंदिरात रंगली. या मुलाखतीत गाडगीळ यांनी दादा कोंडके, बाळासाहेब ठाकरे, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि अन्य मंडळींचे किस्से सांगत, विविध मान्यवरांच्या आठवणींचा पेटारा सातारकरांपुढे उघडला.
नगरपालिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहपुरी शाखेच्यावतीने आयोजित मराठी भाषा पंधरावड्याचा समारोप सुधीर गाडगीळ यांची मुलाखत आणि पंच्याहत्तरीच्या निमित्ताने त्यांच्या सत्काराने झाला.
स्नेहल दामले व घनश्याम पाटील यांनी गाडगीळ यांची मुलाखत घेतली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, मसापच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष चंद्रकांत बेबले, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत, किशोर बेडकिहाळ, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. राजेंद्र माने, वजीर नदाफ, आर. डी. पाटील, डॉ. उमेश करंबेळकर, अमर बेंद्रे, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. अश्विनी जठार आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
गाडगीळ यांनी मुलाखत क्षेत्रातील त्यांचा प्रवेश, मुलाखती घेताना आलेले अनुभव, मुलाखती घेण्यासाठी लागणारी चिकाटी, मेहनत, मुलाखतीपूर्वी संबंधित व्यक्तीचा मित्रपरिवार, शेजारी यांच्याशी चर्चा करून त्या व्यक्तीच्या कार्याचा अभ्यास, स्वतःच्या आवडीनिवडी, सामाजिक प्रतिष्ठेची जाणीव, हजरजबाबीपणाचे महत्त्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन आणि निवेदन क्षेत्रात शब्दांची सोपी मांडणी, पुस्तक वाचन, वक्तशीरपणा या गोष्टींना महत्त्व आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके हे एकमेव असे होते की, त्यांनी माझी फिरकी घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी मला फ्लॅट देऊ केला होता; परंतु तो मी नम्रपणे नाकारला. त्याचे बाळासाहेबांना अप्रूप वाटले होते. त्यांनी मला आलिंगन देऊन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून, गप्पा मारल्या होत्या, असे गाडगीळ यांनी सांगितले. पंडित भीमसेन जोशी, शरद पवार, आशा भोसले, माधुरी दीक्षित आणि विविध मान्यवरांच्या मुलाखतींचे किस्सेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी म्हणाले, मराठी भाषा पंधरावडा उपक्रम गेली 14 वर्षे सुरू असून, यात पालिकेचे मोठे योगदान आहे. सातारा ही देशातील एकमेव पालिका आहे, जी मराठी भाषा संवर्धनासाठी काम करते. सातार्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, अशी मागणी आम्ही केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्र दिले आहे.
प्रारंभी गाडगीळ यांच्या हस्ते अभिवाचन व काव्यवाचन स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. अॅड. चंद्रकांत बेबले यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार सावंत यांनी आभार मानले. दरम्यान, पंच्याहत्तरीच्या निमित्ताने गाडगीळ यांचा विनोद कुलकणों, अमोल मोहिते यांच्या हस्ते कंदी पेढ्याचा हार घालून आणि शाल देऊन, सत्कार करण्यात आला. स्नेहल दामले यांनी मानपत्राचे वाचन केले.