दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
झुआरी फार्महब लिमिटेड, कृषी विकास प्रयोगशाळा बारामती व फ्युचर फलटण शेतकरी उत्पादक कंपनी लि. गोखळी यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील ११४ सभासद शेतकरी बांधवांना मोफत माती परीक्षणाचा लाभ देण्यात आला.
पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता ही अत्यंत गरजेची व महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक वर्षी पीक घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत असतो. याचा परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होतो. जमिनीची सुपिकता आजमाविण्यासाठी माती परीक्षण करण्याची गरज आहे. माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजण्यास मदत होते. त्यानुसार पिकांना रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते. शाश्वत शेतीसाठी मातीचा प्रातिनिधीक नमुना घेणे व त्याचे योग्य प्रकारे पृथ:करण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या सर्व बाबींचा विचार करत फ्युचर फलटण शेतकरी उत्पादक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मोनाली गावडे यांनी शेतकर्यांच्या शेतात जाऊन शेतकर्यांना माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले व योग्यप्रकारे माती नमुना काढण्याचे प्रात्यक्षिक दाखवून तालुक्यातील ११४ शेतकर्यांचे नमुने झुआरी फार्महब लिमिटेड, कृषी विकास प्रयोगशाळा बारामती ार्फत तपासून दिले.
माती परीक्षणाची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यत: नमुना घेण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. म्हणूनच नमुना हा शास्त्रोक्त पद्धतीने घेणे गरजेचे आहे.
उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा भडीमार वापर करून आपण जमिनीचा पोत खराब करून ठेवला आहे. आगामी काळात आपल्याला चांगल्या उत्पादनाकरीता माती आणि पाणी यांचे परीक्षण करून घेण्याचा सल्ला झुआरी फार्महब लिमिटेडचे फिल्ड अधिकारी सिकंदर जाधव यांनी यावेळी दिला.
फ्युचर फलटण शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे पुढील काळात माती-पाणी परीक्षण, कृषी निविष्ठा, शेतकरी सुविधा केंद्र तसेच विविध शासकीय योजनांचा सभासद बांधवांनी फायदा घ्यावा, असे आव्हान प्रकल्प समन्वयक डॉ. मिलिंद जोशी यांनी शेतकरी बांधवांना केले.
फ्युचर फलटण शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे शेतकर्यांसाठी बी-बियाणे, खते-औषधे, किटकनाशके, शेती साहित्य, मोफत प्रशिक्षणे, कृषी सल्ला, प्रक्षेत्र भेटी, शेतकरी सहली, माती-पाणी परीक्षण, शेतमाल विक्री व्यवस्थापन अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.