
आत्ता पर्यंत ४७ बाधिताचा आकडा : वाठार स्टेशनला चार तर नायगांवत एक नव्याने रुग्ण वाढले
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. ४ : जिल्हयासह कोरेगाव तालुक्यात करोनाचा उद्रेक वाढत आहे. उत्तर भागात चार दिवसात चार गावांत सतरा कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. करोनाचे समुह संक्रमण थांबेनासे झाले आहे. आज उत्तर भागात वाठार स्टेशनमध्ये चार तर नायगांव येथील एक असे बाधित आढळून आले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली असून कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आत्ता पर्यंत भागात एकूण ४७ रुग्ण झाले आहेत.
गेल्या काही दिवसात उत्तर कोरेगाव तालुक्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मागील चार दिवसापूर्वी दि. १ रोजी वाघोली येथे चार, पिंपोडे बुद्रुक एक, घिगेवाडी एक, वाठार स्टेशन तीन असे सात पेशंट सापडले होते. आज पुन्हा पाच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये नायगांव मधील ४० वर्षीय पुरुष बाधीत व्यक्तीला गेल्या दोन दिवसामध्ये ताप, खोकला येत होता. पिंपोडे बुद्रुक येथे कोव्हिड सेंटरमध्ये आज स्वेब तपासल्यानंतर नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोरेगाव येथे विलगिकर कक्षात पाठवण्यात आले आहे. तर वाठार स्टेशन येथील १ ऑगस्ट रोजी तीन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, त्याचं कुटुंबातील हाय रिस्क मधील १४ जणांचे नमुने आज तपासण्यात आले त्यामध्ये चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना पुढील उपचारासाठी कोरेगाव या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. कोरोना बाधित भाग कन्टेन्टनमेट झोन परिसर सोडला तर बंदची झळ व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसल्याने व्यापाऱ्यांच्यात उद्रेक सुरु झाला होता. तसेच लॉकडाऊन असतांना सुध्दा जिल्हयात दररोज दीडशे ते दोनशेच्या वर रुग्ण सापडत आहेत. ही भागासाठी व परिसरासाठी चिंतेची बाब आहे. नियम व अटीवर जिल्हाधिकारी यांनी दि.१ ऑगस्ट पासून लॉकडाऊन शिथिल करुन छोटे मोठे व्यवसाय व बाजारपेठ सुरु करुन व्यवसायाकांना चालना व लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न केला आहे. यामुळे अत्यावश्यक खरेदीसाठी बाजारपेठेत आसपासच्या ग्राहकांची वर्दळ सुरु झाली आहे. मात्र वाढत्या रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळून, सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर, प्रशासनाच्या नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. तसेच ही साखळी रोखण्यासाठी उपाययोजना होण्याची गरज आहे. आत्तापर्यंत कोरोना संसर्ग झाल्यापासून वाघोली, पिंपोडे बुद्रुक, सोनके, वाठार स्टेशन, नायगांव, घिगेवाडी, करंजखोप या गावातून एकूण ४७ रुग्ण झाले आहेत. २२ उपचार घेत आहेत, तर दोन मृत्यु व इतर सर्वजण बरे झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य गायकवाड यांनी दिली.
कोरोना बाधित पेशंटची हिस्टरी किंवा माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या आरोग्यसेविका व आशासेविकांना संबधित कुटुंब व नातेवाईकाकडून व्यवस्थित माहिती मिळत नसल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. माहिती वेळेत व व्यवस्थित दिली तर पुढील उपचार करण्यास मदत होऊ शकते.