कोरोनामुळे मृत झालेल्या महिलेवर म्हसवड येथील मान गंगा नदी पात्रात अंत्यसंस्कार करताना पालिकेचे कर्मचारी. |
स्थैर्य, म्हसवड दि. ४ : म्हसवड परिसरातील ग्रामीण भागातील कोरोना बाधित महिलेचा दुर्देवी अंत झाल्याने म्हसवड नगरपरिषदेच्या कोव्हिड योध्द्यांनी माणगंगेच्या नदीपात्रात सर्व सोपस्कर पार पाडीत मयत महिलेवर अंत्यसंस्कार केले, यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे यांनी उपस्थित राहुन पालिका कर्मचार्यांकडुन शासकिय नियमांप्रमाणे सदरच्या मृत्युदेहावर अंत्यसंस्कार करुन घेतले.
माण तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला तर त्या व्यक्तीवर दहिवडी व म्हसवड या ठिकाणीच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे यापुर्वीच शासनाने जाहीर केले असल्याने दि.४ रोजी मयत झालेली कोरोना बाधित महिला ही म्हसवड परिसरातील खडकी या गावातील असल्याने तिच्यावर म्हसवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान म्हसवड येथे ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती महिला ७५ वर्षाची असुन ५ दिवसांपुर्वी तिचा कोरोना अहवाल हा बाधित आल्याने तिला सातारा येथे कोव्हिड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरु असतानाच तिचा अंत झाला. खडकी हे गांव म्हसवड परिसरात असल्याने संबधित मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी म्हसवड नगरपिषदेकडे देण्यात आली होती त्यामुळे म्हसवड पालिकेने यापुर्वीच येथील स्मशानभुमीच्या पाठीमागील बाजुस स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मयत महिलेला ह्र्दयाचा त्रास होता तर तिच्या पतीचे गत महिन्यात निधन झाले होते त्यासाठी तिचे निकटवर्तीय नातेवाईक मुंबई येथुन खडकी येथे आले होते त्यामुळेच संबधीत मयत महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे असुन या महिलेच्या घरातील अन्य ५ जणांचे कोरोना अहवाल हे पाझिटीव्ह आले असल्याने त्यांच्यावरही या महिलेसोबत सातारा येथे उपचार सुरु आहेत.
संबधीत महिलेचा मृत्युदेह दि. ४ रोजी वडुज येथील शववाहिनीने म्हसवड येथे आणताच म्हसवडकरांची घाबरगुंडी उडाली. शववाहिनीतुन आणण्यात आलेला मृत्युदेह पुर्णपणे प्लास्टिक मध्ये गुंडाळण्यात आला होता यावेळी पालिका कर्मचार्यांनी संपुर्ण पी.पी.ई. किटचे परिधान करुन तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी स.पो.नि. गणेश वाघमोडे मुख्याधिकारी चेतना केरुरे, सागर सरतापे आदी उपस्थित होते.