औंध संग्रहालयाच्या विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार ; वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्यासह पर्यावरणाचा समतोल राखावा


स्थैर्य, सातारा, दि. 2 ऑक्टोबर : औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र आहे. औंध संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या वारशाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असून, ते करताना कामे दर्जेदार आणि हेरिटेज पद्धतीने व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये तसेच या स्मारकांच्या परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, दूरदृष्य प्रणालीद्वारे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, औंध येथील श्री भवानी संग्रहालय आणि ग्रंथालय हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक महत्त्वाचे केंद्र आहे. औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी याची स्थापना केली. जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे, शिल्पकला, दुर्मीळ ग्रंथ आणि पुरातन वस्तू यांचा अमूल्य ठेवा या संग्रहालयात जतन केला आहे. संशोधक, अभ्यासक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. औंध संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी 52 कोटी 6 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्याअंतर्गत इमारतीचे संवर्धन, नवीन बांधकाम, अंतर्गत दालनांची उभारणी तसेच चित्रे-शिल्पे-ग्रंथांचे जतन अशा कामांचा समावेश आहे. औंधचे संग्रहालय हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव आहे. या ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, मात्र या वारशाचे संवर्धन करताना दर्जा, सौंदर्य आणि पर्यावरणाचा समतोल राखूनच कामे करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

 

 


Back to top button
Don`t copy text!