कोरोना प्रतिबंधासोबतच मान्सूनपूर्व उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

स्थैर्य, पुणे, दि. 08 : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसानभरपाईसाठीचा निधी देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात गतवर्षीची पूरस्थिती विचारात घेऊन अत्यंत काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’ मध्ये मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विश्वजीत कदम, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, मान्सूनच्या आगमनापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था विभागाने केल्या आहेत. ज्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी अधिक दक्षतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने पावसाळ्याच्या सुरुवातीला नव्या ११६ बचाव कार्य बोटी उपलब्ध केल्या आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी बोटी खरेदीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. गतवर्षी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात झालेल्या पूरस्थितीचा अनुभव विचारात घेत यावर्षी नियोजन करावे. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात नियोजन करताना गावपातळीवर माजी सैनिकांना या कार्यात सामावून घेणे शक्य आहे, त्यादृष्टीने नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने तातडीने पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना देत श्री.वडेट्टीवार म्हणाले, निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांचे तसेच बाधितांचे पंचनामे तातडीने करा, नुकसान भरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच धरणातील पाणीसाठा स्थिती आणि पावसाळ्यातील  दक्षता यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात गतवर्षीची पूरस्थिती विचारात घेता अधिकची पोलीस यंत्रणा पावसाळ्याच्या कालावधीत लागणार असल्याचे सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करताना गतवर्षातील त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी  घेण्यात आली आहे. गतवर्षी पुण्याबरोबरच सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील नागरिकांची गैरसोय झाली होती. यावर्षी पावसामुळे अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी अलमट्टी धरणाचा विसर्ग न वाढल्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली, यावर्षी याबाबतच्या दक्षतेबाबत डॉ.म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झालेले सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मान्सून पूर्व तयारीची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!