स्वर्गीय पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीला प्रेरणा देईल – खासदार शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०३ एप्रिल २०२२ । सांगली । स्वर्गीय पतंगराव कदम यांनी प्रतिकुल परिस्थितीत पुण्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या शहरात शैक्षणिक विद्यापीठ स्थापन करुन ज्ञानदानाचे अलौकिक कार्य केले आहे. आज त्यांच्या विद्यापीठात सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. त्याच बरोबर राजकीय क्षेत्रातही ते प्रभावी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेला पुर्णाकृती पुतळा नव्या पिढीला सदैव प्रेरणा देईल, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

 सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने विजयनगर सांगली येथे स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारणे व बहुउद्देशीय सभागृह बांधणे या कामाचे भूमिपूजन माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार मोहन कदम, आमदार अरुण लाड, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रमसिंह सावंत,  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, विशाल पाटील, किशोर जामदार आदि उपस्थित होते.

खासदार शरद पवार म्हणाले, स्वर्गीय पंतगराव कदमांनी सांगली जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. मंत्रीपदावर असताना त्यांनी अनेक क्षेत्रात आपल्या कामांचा ठसा उमटवला. त्याचबरोबर विधानसभेत त्यांच्या सूचना नेहमीच लक्षवेधी ठरत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी नेहमी गुणवत्ता व दर्जा उत्तमपणे जोपासला, अनेक क्षेत्रात सहभाग घेतला, याबद्दल सांगलीकरांना त्यांचा नेहमीच अभिमान राहिल.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले, स्वर्गीय पंतगराव कदम यांची मंत्रीमंडळात काम करण्याची पध्दत अत्यंत गतीमान होती. ते महसुलमंत्री असताना केवळ एका दिवसात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयालयासाठी कृषी विभागाची जमीन हस्तांतरीत करुन घेतली. त्यांच्या कामाचे फलित आज सांगलीत शासकीय कार्यालयांचे हे मोठे संकुल उभे राहिले आहे. त्यांच्या कामाचा आणि कर्तृत्वाची साक्ष देणारे त्यांचे स्मारक सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक ते विद्यापीठाचा कुलगुरु ही त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे.

कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी म्हणाले, स्वर्गीय पतंगराव कदम यांनी जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासात बहुमोल योगदान दिली. अनेक लोककल्याणकारी निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी आपले कार्यकर्तृत्व सिध्द केले. त्यांचा स्मरणार्थ होणारा पुर्णाकृती पुतळा प्रेरणादायी ठरेल.

प्रास्ताविकात महापौर दिग्विजय सुर्यवंशी म्हणाले, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्व असेच स्मारक या ठिकाणी उभारण्यात येईल. महानगरपालिकेच्या वतीने 35 लाख रूपये खर्च करून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी 1 कोटी रुपये खर्चुन बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येणार आहे.  हे सभागृह सर्वांसाठी खुले असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!