
स्थैर्य, सातारा, दि. १४: येथील मंगळवार पेठ पॉवर हाऊसजवळ डिसेंबर 2020 मध्ये सराईत गुन्हेगार विजय उर्फ पिल्या राजू नलवडे रा. बोगदा मंगळवार पेठ सातारा याने त्याचे साथीदारांसह फिर्यादीचे घरामध्ये घुसून त्यास शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देऊन पट्ट्याने मारहाण करून जखमी केले होते. याप्रकरणी फिर्यादी वैभव जयराम कदम, रा. मंगळवार पेठ सातारा यांच्या तक्रारीवरून आरोपी व त्याचे साथीदार विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यापासून आरोपी विजय राजू नलवडे हा अस्तित्व लपून राहत असल्याने तो पोलिसांना मिळून येत नव्हता. आज रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना हा आरोपी राजवाडा परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांनी राजवाडा परीसरात सापळा लावून नमूद आरोपीस ताब्यात घेतले व त्यास गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आले आहे. अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मारामारीचे गुन्ह्यामध्ये सुमारे चार महिन्यांपासून पाहिजे असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास जेरबंद केले आहे.
या आरोपीवर यापूर्वी दरोडा, जबरीचोरी, गर्दी-मारामारी, दहशत करून गंभीर दुखापत करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पो. ना. अमित माने, स्वप्नील कुंभार, पो. का. मोहन पवार, पंकज मोहीते, ओमकार यादव यांनी केली आहे.