पाच कोटीच्या खंडणीप्रकरणातील फरार संशयितांना फलटण तालुक्यातुन जेरबंद; लोणंद पोलिसांची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुन २०२१ । फलटण । लोणंद तसेच बारामती पोलीस ठाणेकडील पाच कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तिरकवाडी, ता. फलटण येथून लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव रा. तिरकवाडी, ता. फलटण आणि विशाल दिनकर नरवडे रा. नर्‍हे, जि. पुणे अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की दि. 5 रोजी डोंबाळवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत सुळवस्तीवरील कॅनलच्या पुलावरुन अविनाश शामराव सोनवलकर रा. डोंबाळवाडी यांचे अपहरण करुन पाच कोटींची खंडणी आरोपींनी मागितली होती. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अपहरण झालेल्या व्यक्तीची लोणंद पोलीसांनी त्याच दिवशी फलटण येथून संशयित सुनिल लक्ष्मण दडस रा. दुधेबाबी याच्या प्लॅटमधून सुटका केली होती. परंतु, आरोपी परागंदा झाले होते. तसेच आरोपींनी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही याचप्रकारे पाच कोटी खंडणीकरीता एकाचे अपहरण केले होते. यातील आरोपी गुन्हा घडलेपासून फरार होते. आरोपींच्या मागावर लोणंद पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची टिम होती.

दरम्यान, लोणंद पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील फरार संशयित प्रविण ऊर्फ सोन्या नवनाथ गुरव रा. तिरकवाडी, ता. फलटण व बारामती शहर पोलीस ठाण्यातील खंडणीप्रकरणी फरार संशयित विशाल दिनकर नरवडे रा. नर्‍हे, जि. पुणे हे दोघे तिरकवाडी येथे असल्याची माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांना मिळाली होती. त्यानुसार तत्काळ पोउनि गणेश माने व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तिरकवाडी, ता. फलटण येथे सापळा रचून शिताफीने दोन्ही फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, पोलीस कॉस्टेबल श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, सागर धेंडे, अमोल पवार, ज्ञानेश्‍वर साबळे यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!