स्थैर्य, सातारा, दि. 6 : युवकांना नौदल, आर्मीमध्ये नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून 1 कोेटींची फसवणूक प्रकरणी दोषारोप दाखल असूनही परांगदा झालेल्या दोन संशयीत आरोपींना पोलिसंनी दहिवडीतून ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी, 2017 ते 2018 मध्ये सातारा जिल्हयातील सातारा, कोरेगांव, माण, जावली, कराड, पाटण या तालुक्यातील 19 ते 25 वयोगटातील बेरोजगार तरुण व तरुणीना नौदल, आर्मी, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक अशा ब वर्ग, सी वर्गातील शासकीय पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून मुंबई, कोलकाता येथे नेवून त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देवुन त्यांचेकडुन प्रत्येकी तीन ते पाच लाखापर्यंत रक्कम स्विकारुन सुमारे एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बोरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील काही आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. परंतु, या गुन्हयातील आरोपी नंतर परांगदा झालेले होते. जिल्हयातील अनेक तरुण-तरुणींची या आरोपींकडून मोठया स्वरुपात फसवणुक झाली असल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या गुन्ह्याचा पुन्हा तपास सुरू केला. यातील आरोपींचा ठावठिकाणा मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालयाकडील पोउनि राजेंद्र यादव, हवालदार राकेश देवकर, पोलीस नाईक संतोष देशमुख, बोरगाव पोलीस ठाणेकडील पो. कॉ. चेतन बगाडे टोणे, नदाफ असे पोलीस कर्मचारी यांनी आरोपीचा पनवेल, दहीवडी येथे जावून शोध घेवून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख करत आहेत.