स्थैर्य, वाई, दि.१८: आनेवाडी टोलनाक्यावर मार्च 2019 मध्ये मोक्का गुन्ह्यातील एका फरार आरोपीने अंधाधुंद गोळीबार करून एका कर्मचार्यास जखमी केले होते. त्यास पुणे एलसीबी (ग्रामीण)च्या पथकाने वांगणी, ता. वेल्हे जि. पुणे गावच्या हद्दीत जेरबंद केले आहे. त्यास पुढील तपासाकरिता भुईंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती अशी, मोक्काअंतर्गत गुन्ह्यांतील व फरार असलेल्या सोपान दिनकर चोरगे रा. वांगणी, ता. वेल्हे, जि. पुणे याने आनेवाडी टोलनाका येथे टोल भरण्याच्या वादातून गावठी पिस्टलमधून अंधाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये पांडुरंग घनश्याम पवार रा. चिंचवली, ता. वाई हे जखमी झाले होते. याबाबतची फिर्याद पांडुरंग घनश्याम पवार यांनी दि. 25 मार्च 2019 रोजी भुईंज पोलिस ठाण्यात दिली होती.
या गुन्ह्यातील आरोपींनी यापुर्वीही संघटीतरित्या असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यास मोक्का हे कलम लावण्यात आले आहे. आरोपींपैकी सोपान दिनकर चोरगे वय वर्षेे 32 रा. वांगणी, ता. वेल्हे हा दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी वांगणी गावच्या हद्दीतील कल्याण खिंड परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा (पुणे ग्रामीण) यांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोउपनि रामेश्वर धोंडगे, सफौ दत्तात्रय जगताप, हवालदार राजेंद्र चंदनशिव, मंगेश भगत, लियाकतअली मुजावर, अक्षय जावळे, अमोल शेडगे यांच्या टीमने वांगणी हद्दीतील कल्याण खिंड परिसरात सोपान दिनकर चोरगे वय वर्षे 32 रा. वांगणी, ता. वेल्हे जि. पुणे यास ट्रॅप लावून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आनेवाडीतील गोळीबार साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे कबुल केले आहे. घटनेपासून आरोपी फरारी असल्याने त्यास पुढील कारवाई कामी वैद्यकीय तपासणी करून भुईंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.