स्थैर्य, कोरेगाव, दि.०९: किन्हई, ता. कोरेगाव येथे दि. 17 डिसेंबर 2020 रोजी वाळू उपसा करण्यासाठी मजूर देण्याच्या मागणीवरुन एका शेतकर्यास जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मोक्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी आकाश संदीप साबळे (रा. शिवथर) याला गोवा राज्यात कोरेगाव पोलिसांचे निर्भया पथकाने ताब्यात घेतले. या पथकाला सातार्यापासून गोव्यापर्यंत सायबर पोलिसांनी सतत संपर्कात राहून मदत केली. साबळे हा सातत्याने पोलिसांना गुंगारा देत वारंवार ठिकाणे बदलत होता.
अक्षय पवार याने केलेल्या गोळीबारावेळी आकाश साबळे हा तेथे होता. किन्हई हे त्याचे आजोळ आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर साबळे हा फरार झाला होता. तो सातत्याने ठिकाणे बदलत पोलिसांना गुंगारा दिला होता. गुन्ह्याचा तपास हाती आल्यानंतर उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी कोणत्याही परिस्थितीत साबळे याला जेरबंद करायचे असा निश्चय केला होता. हवालदार के. के. कुंभार यांच्यासह निर्भया पथकातील सागर गायकवाड, हेमंत शिंदे, साहिल झारी व संतोष जाधव यांनी साबळे याची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली होती.
गोवा राज्यात म्हापसा येथे साबळे वास्तव्यास असल्याची माहिती समजताच, सायबर पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे, कर्मचारी महेश पवार व वर्षा खोचे यांनी तांत्रिक माहिती संकलित केली. सातार्यापासून गोवा राज्याच्या प्रवासापर्यंत सायबर पोलिसांनी सतत सहाय्य केले आणि म्हापसा येथे साबळे हा पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर अधीक्षक धीरज पाटील व उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी या पथकाचे अभिनंदन केले.