इंधन दरवाढीचा भडका; सिलिंडरच्या किमतीत झाली मोठी वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । मुंबई । रशिया-युक्रेन युद्धाने नैसर्गिक वायूच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आज मंगळवारी १ मार्च २०२२ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी वाणिज्य वापरातील १९ किलोच्या एलपीजीच्या किमतीत १०५ रुपयांची वाढ केली. त्याशिवाय ५ किलोचा एलपीजी सिलिंडर २७ रुपयांनी महागला असून तो ५६९ रुपये इतका झाला. आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे तूर्त कोट्यवधी घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे तर व्यावसायिकांना मात्र दरवाढीचा भार सोसावा लागणार आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला. गेल्याच महिन्यात १९ किलोच्या वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ९१.५ रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र अलीकडे रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक कमॉडिटी बाजारात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांवरील इंधन आयातीचा खर्च वाढला होता.

वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत आज १०५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव १९६२ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर आजपासून २०१२ रुपये झाला आहे. तर चेन्नईत २१८५.५ रुपये इतका झाला आहे. कोलकात्यात १९ किलो सिलींडरसाठी २०८९ रुपये दर असेल.

दरम्यान, सलग चौथ्या महिन्यात घरगुती वापराच्या सिलिंडरचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. आज १ मार्च २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरच्या किमती डिसेंबर २०२१ नुसार स्थिर आहेत. मुंबई आणि दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरचा दर ९०० रुपये आहे. कोलकात्यात ९२६ रुपये आणि चेन्नईत ९१६ रुपये दर आहे.


Back to top button
Don`t copy text!