मोदी सरकाच्या आडमुठेपणामुळेच इंधनाची दरवाढ; आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप : भरमसाठ कर लावल्यानेच दरवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२०: देशात इंधनाचे दर वाढू लागले आहेत, याला कारण केवळ मोदी सरकारचा आडमुठेपणा आहे. कोेरोना उपाययोजनासाठी खर्च केल्याचे मोठे आकडे केंद्र सरकार दाखवत आहे. परंतु, त्याहून कितीतरी अधिकपट पैसा केंद्र सरकारने इंधनावर भरमसाठ कर लावून सर्वसामान्यांकडून वसूल केला असल्याची टिका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दरम्यान, काँग्रेसची कार्यकारिणीची निवड होत असून 49 जणांची नावे जाहीर झाली आहेत तर लवकरच उर्वरित नावे जाहीर होतील, अशी माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.राष्ट्रीय काँग्रेसच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी काँग्रेसच्या कार्यालयात झाल्या. याबाबतची माहिती देताना आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. चव्हाण म्हणाले की, जिल्हा काँग्रेसची जवळपास 100 जणांची कार्यकारिणी जाहीर करत आहोत. या कार्यकारिणीची बैठक दर महिन्याला घेण्यात येणार असून या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना येणार्‍या समस्या तसेच पक्षाच्या पुढील वाटचालीबाबबत चर्चा होतील व निर्णय घेता येतील. नव्या कार्यकारिणीची निवड झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. सर्वजण उत्साहाने काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  जिल्हा बँकेच्या निवडणुकांबाबत पत्रकारांनी छेडले असता त्यांनी याबाबत पक्षांंतर्गत चर्चा सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची याबाबत चर्चा करून निर्णय होईल, असे सांगितले. महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. पंतप्रधान मोदी हे इंधनाच्या दरवाढीला मागील सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. याबाबतचा प्रश्‍न पत्रकारांनी उपस्थित केला असता आ. चव्हाण म्हणाले, इंधनदरवाढीला केवळ मोदी सरकारचा आडमुठेपणा कारण आहे. कोरोना उपाययोजनासाठी खर्च केल्याचे मोठे आकडे केंद्र सरकार दाखवत आहे, त्याच्या कितीतरी पटीने केंद्र सरकारने इंधनावर भरमसाठ कर लावून सर्वसामान्यांकडून पैसा वसूल केला आहे. केंद्र सरकार जरी मागील सरकारवर बोट दाखवत असेल तरी त्याकाळात आणि आताही देशातील जवळपास 85 टक्के कच्चे तेल हे आयात करावे लागते. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध तेल बनवले जाते. यासाठी जेवढा खर्च येतो त्यावर भरमसाठ कर लावून हे दर वाढवले आहेत. आपल्या शेजारील पाकिस्तान आणि श्रीलंकेत आपल्यापेक्षा कितीतरी कमी दर आहेत. त्यामुळे मागील सरकारला जबाबदार धरणे चूक आहे. सध्याच्या केंद्र सरकारने देशात इंधनाचे स्त्रोत शोधण्याबाबत काय केले तेही सांगावे, असा सवालही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत असून नागरिकांनी गाफिल न राहता काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन करतानाच आमदारांना लस द्यायकी की नाही, हा प्रशासकीय पातळीवरील विषय असून टप्प्या-टप्प्यानुसार लस दिली केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!