स्थैर्य, फलटण, दि. ०९ : सध्या फलटणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार विकेंड लोकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. त्या सोबतच सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कलम १४४ चे आदेश पारित केलेले आहेत व त्याची कडक अंमलबजावणी सध्या प्रशाशनाकडून होत आहे. त्या मुळे शनिवारी व रविवारी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाला व भुसार मार्केट हे पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली.
शनिवार व रविवारी श्रीमंत शिवाजीराजे फळे व भाजीपाला मार्केट आणि रविवारी भुसार मार्केट मधील लिलाव पूर्णपणे बंद राहील. भुसार शेतमालाचे लिलाव हे रविवार ऐवजी सोमवारी नियमितपणे सुरु राहणार आहेत. श्रीमंत शिवाजीराजे फळे व भाजीपाला मार्केट मधील लिलाव हे सोमवार ते शुक्रवार रोजी नियमितपणे सुरु राहतील. तरी शेतकरी बंधू, भुसार आणि फळे व भाजीपाला अडदार व्यापारी, खरेदीदार, हमाल, मापाडी यांनी याची नोंद घ्यावी, असेही फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी स्पष्ट केले.