दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२१ | सातारा | ऊस एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी पैसे शेतकर्यांना देण्यात यावे, यासाठी विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या बरोबर बुधवारी नियोजन भवन येथे बैठक झाली. मात्र, यामध्ये कोणताही ठोस निर्णय झाला नाही, म्हणून ऐन दिवाळीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच कारखान्यांचे संचालक यांच्या दारात बसून गनिमी काव्याने सर्व संघटना एकत्र येवून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळी राजा संघटना, शरद जोशी शेतकरी संघटनेचे पदाधिकार्यांमध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके, अर्जून साळुंखे, धनंजय महामुलकर, दादासाहेब यादव, ड. विजय चव्हाण, रमेश पिसाळ, बळीराजाचे पंजाबराव पाटील, साजिद मुल्ला, रयत क्रांतीचे युवा जिल्हाध्यक्ष सोनु उर्फ प्रकाश साबळे, मधुकर जाधव आदी उपस्थित होते.
एकरकमी एफआरपीबाबत कोणताही निर्णय न झाल्याने ऐन दिवाळीत ऊस उत्पादकांना शिमगा करण्याची वेळ आली आहे. कारखानदार व शेतकरी संघटनांची बैठक निष्फळ ठरली. जिल्हा प्रशासनाने हात वर करत साखर आयुक्त विभागांना खोटी माहिती दिल्याचे पुराव्यानिशी माहिती सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनही हतबल झाले. जिल्हाधिकार्यांनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेतली . साखर आयुक्तांशी चर्चा करण्याच्या आश्वासनापलीकडे या शेतकरी संघटनांना ठोस हातात काहीच लागले नाही . एकरकमी एफआरपी साठी सर्व शेतकरी संघटना एकत्रितरित्या आरपारची लढाई गनिमी काव्याने लढणार असल्याची तिखट प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली .
केंद्र शासनाचा कायद्या अन त्यामध्ये राज्य शासनाने बदल, तडजोड न करता त्यामध्ये शेतकर्यांची फसवणूक सुरु केली आहे. राज्य शासन दुसर्या बाजूला एमएसबीची बिले, बँकांची कर्जे व्याजासह वसुल करण्यासाठी तगादा लावत आहे. पण न्याय देण्याच्या भूमिकेवेळी ते दिले जात नाही. कायदे पाळले जात नाही तर आम्ही ही कायदे पाळणार नसल्याचे सर्वच शेतकरी संघटनेने सांगितले.
एफआरपीसाठी तीव्र आंदोलन करणार
उस एफआरपीची बैठक निष्फळ ठरल्यानंतर सर्व संघटनांनी एकत्रित येत सांगितले की, एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशी घोषणाबाजी करत त्यांनी सांगितले की, जे कारखानदार एक रक्कमी एफआरपी देणार नाहीत अथवा जाहीर करणार नाहीत, अशा कारखान्याच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एकजुटीने शेतकर्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.