स्थैर्य, फलटण दि.१५ : फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांकडून वारंवार एफ.आर.पी. कायद्याचे उल्लंघन असून अशा कारखान्यांवर जप्तीची कारवाई करुन ऊस उत्पादक शेतकर्यांना थकीत रक्कम अदा करावी, अशी मागणी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
शेतकरी कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेला आहे. अशा परिस्थितीत कारखाना व्यवस्थापन मनमानी करत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. असे असताना आपण कारखान्यांना फक्त नोटीसा न देता प्रत्यक्ष कायद्याप्रमाणे कारवाई करणे अपेक्षित आहे. कारखान्यांना शेतकर्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर अशा थकीत एफ.आर.पी. असणार्या कारखान्यांवर जप्ती आदेश देऊन तालुक्यातील शेतकर्यांची ऊसबीले तात्काळ अदा करण्यात यावीत. अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्हाला आंदोलन उभारावे लागेल, असा इशाराही झणझणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.