स्थैर्य, फलटण : मागील वर्षीच्या ऊस गाळप हंगामातील थकीत असलेली शेतकऱ्यांची एफ.आर.पी. संपूर्ण रक्कम व कामगारांची देणी दिल्याशिवाय चालू वर्षीचा गाळप परवाना देण्यात येऊ नये अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते तथा सातारा व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराज खलाटे यांनी दिले आहे.
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात महाराष्ट्रातील ज्या कारखानदारांनी शेतकऱ्यांची मागील हंगामातील एफ.आर.पी. रक्कम व कामगारांचे देणी दिले नाहीत अशा कोणत्याही साखर कारखान्यास येणाऱ्या गळीत हंगामामध्ये गाळपाची परवानगी देऊ नये असे म्हटले आहे. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकऱ्यांची थकबाकी एफ. आर. पी.ची रक्कम पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यास गाळप परवाना देणार नाही असे आश्वासन शंभूराज खलाटे यांना दिले आहे. राज्यातील बऱ्याच साखर कारखान्यावर आर. आर. सी. ची कारवाई करण्यात आली या गळीत हंगामाच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे पैसे कारखानदार देतील अशी आशा आयुक्त शेखर गायकवाड यांच्या भूमीकेमुळे वाटत आहे असे शंभूराज खलाटे यांनी सांगितले.
यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्य प्रवक्ते शंभूराज खलाटे, सांगलीचे जिल्हाप्रमुख स्वप्नील पाटील, सातारचे अपंग क्रांती जिल्हाप्रमुख अमोल कारंडे, फलटण तालुका प्रमुख सागर गावडे, शिराळा तालुकाप्रमुख बंटी नांगरे पाटील, सोलापूरचे किरण भांगे यांच्यासह सातारा,सांगली,सोलापुर,कोल्हापुर व पुणे येथील शेतकरीपुत्र उपस्थित होते.