कोरेगांवच्या उत्तर भागातील परीस्थिती; कोरोनाच्या परिस्थितीमुळे गावागावात दिसतोय बदल, जि.प.शाळा बनल्या निवासस्थान
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक,दि.1, (रणजित लेंभे) : कोरोना परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रातील आर्थिक नाकेबंदी झाली आहे. बेरोजगार झालेल्या शहरातील बहुतांश कुटुंबांनी आपल्या मुळगावात राहण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शहरातून आलेल्या आपल्याच गाववाल्याकडून काही धोका होऊ नये ,या भीतीने कोरेगांव च्या उत्तर भागातील काही गावातील बहुतांश गावक-यांनी थेट शेतात पत्रा शेड मारून राहण्यास सुरुवात करण्याच्या घटना वाढताना दिसून येत आहेत.
गेल्या दोन महिन्यापांसून कोरोना व्हायरसमुळे अत्यंत गंभीर परिणाम होत आहे. एकीकडे आरोग्याची चिंता , तर दुसरीकडे उत्पन्नाची चिंता अनेकांना दिसून येत आहे. शहरातील सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा बंद असल्याने बेरोजगार झालेल्या नागरिकांनी शहरातून आपल्या गावाकडची वाट धरली आहे. मुंबई , पुणे यासारख्या अन्य शहरासंह काही कुटुंबांनी आपल्या मूळगावाकडे स्थलांतर केले आहे.
शहरातून गावात आलेल्या आपल्याच गाववाल्याकडे पाहण्याची गावातील गावक-यांची नजर बदलत आहे. शहरातून आलेल्या गाववाल्याशी पूर्वीप्रमाणे प्रेमाने होणारी आस्थेची चौकशी तर दूरच , उलट गावात आलेल्यांना आरोग्य केंद्रात तपासणी करून या, शाळेत राहा, असा सल्ला मिळत असल्याने गावात शहरवासीयांची चांगलीच गोची होताना दिसून येत आहे.
शहरातून गावात आलेल्या मूळ गावक-यांशी उगीच वाद नको अन धोका पण नको , अशी भूमिका घेत उत्तर कोरेगांव च्या काही गावातील लोकांनी चक्क आपल्या शेतात पत्रा शेड टाकून राहण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे शहरातील गावात अन गावातले रानात अशीच गत ग्रामीण भागात दिसून येत आहे. प्रत्येक गावात बाहेरून आलेल्या अन्य व्यक्तीवरही गावातील नागरिकांनी चांगलेच लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कोणी पाहुणा माणूस आला तरीही त्याच्याशी पूर्वीप्रमाणे दाखविण्यात येणारे सौजन्य आता बंद होत असल्याचे दिसून येत आहे. उलट ज्या घरी पाहुणा आला , त्या घरातील कुटुंबालाच पाहुणा कशाला आलाय अशी विचारणा होतानाही दिसून येत आहे.
कोरोना व्हायरसमुळे गावातील माणुसकीचा झरा कमी होताना पहिल्यांदाच दिसून येत आहे. शहरातून आलेल्या आपल्याच गाववाल्यांना गावात घेण्यास विरोध करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी दिसून आला. असा प्रकार यापूर्वी कधीच दिसून आला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावक-यात कोरोनाबाबत संपूर्ण जनजागृती झाल्याने गावात आलेल्या गावक-यांशी सोशल डिस्टन्स ठेवून त्यांचा अधिकार त्यांना सन्मानाने देण्यास सुरुवात होत असल्याचे दिसून येत आहे.