दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२१ | फलटण | गत दहा वर्षांपासून टाकळवाडे गाव हे विकासकामांपासून वंचित राहिले होते. आता टाकळवाडे गावचा पूर्ण विकास होण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असून आगामी काळामध्ये टाकळवाडे गाव विकासापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
फलटण तालुक्यातील टाकळवाडे गावामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभाच्या दरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळामध्ये टाकळवाडे गावामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद व आमदार निधीसह विविध विभागांचे निधी हा टाकळवाडे गावासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी काळामध्ये टाकळवाडे गावच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही, याची खात्री सुद्धा या निमित्ताने श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
गावातील सर्व रस्ते, पाणीपुरवठा योजना, शाळा इमारत, अंगणवाडी इमारत, गटारे, सभामंडप, विद्यार्थ्यांना संगणक आदी कामांसह गावचा चौफेर विकास कामे सुरू करण्यात आलेली आहेत. टाकळवाडे गावामध्ये श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांचे नेतृत्वाखाली टाकळवाडे गावचा कोणताही विकासाचा प्रश्न प्रलंबित राहणार नाही, असेही आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.