दैनिक स्थैर्य । दि. 01 जुलै 2021 । मुंबई । कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाउन करण्यात आले. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनशैलीमध्ये झाला. आता या सोबतच आज दि. १ जुलैपासून पुन्हा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. बँकिंग आणि कर, वाहनांवर या नियामांचे मोठे बदल होणार आहेत. या सोबतच आज पासून नक्की कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत, याचा घेतलेला आढावा.
१. घरगुती गॅसच्या किंमतीत बदल होणार – घरगुती गॅसचे दर प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला बदलत असतात. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला घरगुती सिलिंडर गॅस दरात वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो गॅस सिलिंडरमध्ये आजपासून २५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर व व्यावसायिक वापराच्या १९ किलोसाठी ग्राहकांना ८४ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
२. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना दणका – स्टेट बँकेच्या चेकबुकसाठी आता पूर्वीपेक्षा जादा दर आकारला जाणार आहे. तसेच बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून ४ वेळाच एटीएमचा वापर करता येणार आहे. यापेक्षा वेळा एटीएमचा वापर केल्यास अधिक शुल्क आकारण्यात येणार आहे.
३. आयडीबीआय बँकेच्या नियमात बदल – आयडीबीआय बँकेने १ जुलैपासून आपल्या चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील खातेधारक यापूर्वी ७ ते १० वेळा पैसे जमा करण्याची मुभा होती ही मर्यादा आता फक्त ५ वेळा करण्यात आली आहे. ग्राहकांना आता २० पानांची चेकबुकची मोफत सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक चेकसाठी ५ रुपये शुल्क आकारला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर महिन्याला सरासरी १० हजार रक्कम शिल्लक असेल तरच त्यांना लॉकरवर डिस्काउंट दिला जाणार आहे.
४. छोट्या बचतीच्या व्याजात बदल होणार – छोट्या बचतीवर मिळणाऱ्या व्याजात १ जुलैपासून बदल होणार आहेत. यात PPF, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, मंथली इनकम स्कीम, टाईम डिपॉजिट आणि रिकरिंग डिपॉजिट योजनेचा समावेश आहे.
५. लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या फेरा वाचणार – लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी दिली जाऊ शकणार आहे. चाचणीत पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स घरी पाठवून दिले जाणार आहे. लायसन्ससाठी मात्र ट्रॅकवर वाहन चालवून दाखवावे लागणार आहे.
६. सोन्याच्या व्यवहारातील फसवणूक थांबणार – सोन्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून सोन्याच्या प्रत्येक दागिन्याला विशेष ओळख तयार करण्यात येणार आहे. दागिने हरवल्यास किंवा चोरी झाल्यास या यूनिक ओळखीमुळे ओळख पटवण्यात मदत होणार आहे. म्हणूनच प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख (यूआईडी) देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
७. ५० लाखांची खरेदी केल्यास टीडीएस कपात – आयकर कायद्यातील कलम १९४ मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ५० लाखांवरील खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस कपात होणार आहे. तुमची मागच्या वर्षी १० कोटींच्या वर उलाढाल असेल, तर तुम्हाला यंदा ५० लाखांपेक्षा जास्त मटेरियल खरेदी करण्याची मुभा आहे.
८. सिंडिकेट बँकेच्या IFSC कोडमध्ये बदल – सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे आता सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड वापरावा लागणार आहे.
९. मारुती आणि हिरो कंपनीच्या गाड्या महागणार – मारुती आणि हिरोच्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. हिरोच्या दुचाकींच्या एक्स-शो रूम किमतीत 3 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.