दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑक्टोबर २०२२ । फलटण । ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील विविध शाळा – महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मराठी साहित्य – संस्कृतीचा जागर केला. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ ग्रंथपुजनाने फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, म.सा.प.फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पालखीमध्ये ठेवलेल्या ग्रंथांचे पूजन श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर महात्मा फुले चौक, डेक्कन चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतीसिंह नाना पाटील चौक मार्गे ग्रंथदिंडीचे आमगन संमेलनस्थळी नामदेवराव सूर्यवंशी – बेडके महाविद्यालयात झाले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष किशोर बेडकिहाळ व कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले. फलटण तालुका वारकरी सांप्रदायानेही विद्यार्थ्यांसमवेत या ग्रंथदिंडीत सहभाग घेतला होता.
ग्रंथदिंडीमध्ये सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलने पुस्तक, दौत, लेखणी असे साहित्य बोधचिन्ह आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांची छायाचित्रे, यशवंतराव चव्हाणांचे दुर्मिळ छायाचित्र, प्रितीसंगम समाधीची प्रतिकृती, यशवंतराव चव्हाण हायस्कूलने महाराष्ट्र मंगल कलश, यशवंतराव चव्हाणांची प्रतिकृती, नामदेवराव सूर्यवंशी – बेडके महाविद्यालयाने संत साहित्यिकांचा चित्ररथ, प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनि. कॉलेजने महाराष्ट्र कला दर्शन, हणमंतराव पवार हायस्कूल, आनंदवन प्राथमिक विद्यालय व ब्रिलीयंट अॅकॅडमी इंग्लीश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संत साहित्य व साहित्यिकांची परंपरा दाखवणारे चित्ररथ, झांजपथक, स्वच्छतेवरील पथनाट्य आदींचे सादरीकरण केले. शहरातील मालोजीराजे शेती विद्यालय, मुधोजी हायस्कूल, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही या ग्रंथदिंडीत आपला सहभाग नोंदवला.