स्वातंत्र्यवीर सावरकर भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२३ । नवी दिल्ली । स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

महाराष्ट्र सदन येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.

महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरी करण्यात येत आहे. शासनातर्फे नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली होती. ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिना’च्या औचित्याने आज ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची तसेच आनंदाची बाब आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान व त्याग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे साहित्यिक तसेच समाजसुधारक होते. त्यांचे तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट व वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, कपिल पाटील यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित, माजी केंद्रीय मंत्री तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रख्यात शिल्पकार श्रीराम सुतार आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रारंभी महाराष्ट्र सदनच्या प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!