स्वातंत्र्य सैनिक कॉ. वसंतराव आंबेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । सातारा । सातारा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व कम्युनिस्ट विचाराला वाहून घेतलेले क्रांतिसिंह नाना पाटील व कॉ. शेख काका यांचे सहकारी कॉ वसंतराव आंबेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षास येत्या गुरुवार दि. १५ जुलैपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक विजय मांडके यांनी दिली. दि १५ जुलै १९२१ रोजी कॉ वसंतराव आंबेकर यांचा जन्म झाला. येत्या गुरुवार दि १५ जुलै रोजी जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ होत असून वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. वसंतराव आंबेकर यांनी स्वातंत्र्य चळवळ तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भरीव असे योगदान दिले आहे. या दोन्ही लढ्यात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. या चळवळीच्या निमित्ताने क्रांतिसिंह नाना पाटील , आचार्य अत्रे , कर्मवीर भाऊराव पाटील हे आंबेकर यांच्या सातारा येथील घरी नेहमी राहत असत. तसेच साथी एस एम जोशी , स्मृतीशेष आनंदराव चव्हाण , शाहीर अमर शेख , रावसाहेब कळके , हरिभाऊ निंबाळकर यशवंतराव मोहिते , माजी आमदार स्मृतीशेष व्ही. एन. पाटील , कॉ शेख काका , स्वा.सै. बापूसाहेब घाडगे , स्वा. सै. नारायणराव माने अशा अनेकांशी त्यांचे निकटचे संबंध होते. आचार्य अत्रे यांच्या आग्रहामुळे ते पत्रकार झाले. धाडसी स्वभावाने परखड पत्रकार म्हणून त्यांनी दरारा निर्माण केला होता. वसंताश्रम या त्यांच्या हॉटेलसमोर फलक लावून त्यावर सातारा समाचार हे मुखपत्र देखील त्यांनी बराच काळ चालवले. देशभक्त किसन वीर यांच्याशी नातेसंबंध असूनही लोकसभा निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याच प्रचाराचे काम वसंतराव आंबेकर यांनी केले होते. स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच इतर अनेक परिवर्तनवादी चळवळींमध्ये वसंतराव आंबेकर यांनी आपले योगदान दिले आहे. सामाजिक , राजकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव असे काम केले आहे. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीला उभे असताना त्यांच्या प्रचारासाठी खुद्द क्रांतिसिंह नाना पाटील व कॉ शेख काका आले होते. अन्यायाविरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला. अशा या साम्यवादी विचाराच्या नेत्याच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय नियम पाळून कॉ वसंतराव आंबेकर यांच्या प्रतिमेस त्यांच्या पत्नी कमलाबाई आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आंबेकर कुटुंबीय व काही निमंत्रित यांच्या उपस्थितीत गुरुवार दि १५ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता सातारा येथील पोवई नाक्यावरील आंबेकर निवास येथे होईल असे या कार्यक्रमाचे निमंत्रक विजय मांडके यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!