दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मोबाईलच्या युगामध्ये कुस्तीचे महत्त्व कमी होत आहे. तरुणांचे कुस्ती या खेळाच्या रूपाने मातीशी असणारी नाते कमकुवत तर होत नाही ना, अशी भीती क्रीडा जगताला वाटत असताना ध्येयवेड्या क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेल्या क्रीडा शिक्षक विकास भुजबळ (जि. प. प्राथमिक शाळा, सोमंथळी, ता. फलटण) यांनी शाळा व्यवस्थापन समिती व जय हनुमान तालीम सोमंथळी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मे. प्रवीण मसालेवाले, पुणे यांच्या सहकार्याने एक अनोखा उपक्रम म्हणून मोफत कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
सोमंथळी मारूतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये सदर प्रशिक्षण शिबिर सहा दिवस आयोजित करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय गुंजवटे, उपसभापती संजय सोडमिसे, सरपंच किरण सोडमिसे, उपसरपंच तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती लखन यादव व सर्व सदस्य, चेअरमन आबाजी शिपकुले व सोसायटी सदस्य आणि सोमंथळी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये एकूण ५२ मुले, मुली खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
सहभागी प्रशिक्षणार्थींच्या उत्साहाने आणि तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात कै. खाशाबा जाधव यांच्यासारखे ऑलम्पिक खेळाडू तयार होतील, असा विश्वास डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, उपसंचालक श्री. राजेश क्षीरसागर यांनी प्रशिक्षण शिबिरास सदिच्छा भेटीप्रसंगी व्यत केला.
हे शिबिर सोमंथळी पंचक्रोशीतील सर्व कुस्तीशौकीन खेळाडूंना प्रशिक्षण, पूरक व्यायाम, नाष्टा त्यामध्ये दूध, अंडी, केळी, तज्ञ कुस्ती कोच यांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, ऑनलाईन कुस्त्या पाहणे, तज्ञ प्रशिक्षक एन.आय.एस. कोच यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कुस्त्यांचा सराव, अल्पोपहार व समारोप अशा प्रकारच्या या मोफत प्रशिक्षण शिबिरास ग्रामपंचायत सोमंथळी व श्री मारुती देवस्थान ट्रस्ट व विशस्त, नेहरू युवा मंडळ व सर्व युवक मंडळे, श्री. दत्तात्रय नाळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सहा दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिरास कुस्ती हाच श्वास मानणारे विविध कुस्ती वस्ताद, कुस्ती निवेदक, मार्गदर्शक, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळलेले मल्ल यांनी उपस्थिती लावून उद्याच्या होऊ घातलेल्या युवा मल्लांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी पोपटराव काळे, शिक्षणाधिकारी पुणे, विजय कोकरे, ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट फलटण, केंद्रप्रमुख सौ. सुनंदा बागडे मॅडम, दारासिंग निकाळजे, अजित कदम सर, तुषार मोहिते सर त्याबरोबर महाराष्ट्र चॅम्पियन पै. जयदीप गायकवाड, निलेश बाबुराव लोखंडे, एनआयएस कोच विजय होळकर, राजाराम करचे, पांडुरंग महाराज सोडमिसे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले व प्रशिक्षणार्थींना कानमंत्र दिले.
आजच्या कुस्ती प्रशिक्षण शिबिरामध्ये उद्याचे ऑलम्पिकवीर, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, एशियन चॅम्पियन घडविण्यात नक्कीच मोलाचे योगदान राहील, असा आशावादही नामवंत कुस्ती मल्लांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सोमंथळी तालमीचे वस्ताद खाशाबा करचे, दत्तात्रय यादव, राम यादव, नितीन शिपकुले, संतोष सोडमिसे, सागर अलगुडे, पोलीस पाटील शिवाजी सोडमिसे, बाळासाहेब यादव यांनी योग्य दान दिले. या सर्वांचे व मान्यवरांचे आभार दत्तात्रय गोफणे सर व सविता कदम मॅडम यांनी मानले.
या शिबिराला मे. प्रवीण मसालेवाले, पुणे यांनी मोलाचे सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून व सोमंथळी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.