
स्थैर्य, मुंबई, दि. ७: रिलायंस कंपनीत काम करणारे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत कोरोना व्हॅक्सीन दिली जाणार आहे. कंपनीच त्यांचा खर्च उचलणार आहे अशी घोषणा रिलायंस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी केली. कोरोनावर लवकरच आपण सगळे मिळून मात करूया, पण तोपर्यंत काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. कोरोनाविरुद्धची लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. अशात मी आणि मुकेश अंबानी यांनी निर्णय घेतला की रिलायंसच्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत व्हॅक्सीन दिली जाईल.
ज्या कर्मचाऱ्यांना वॅक्सीन घ्यायचे आहे. त्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी. जेणेकरून आपण कोरोनावर लवकरात लवकर मात करू शकेल, असे आवाहन सुद्धा नीता अंबानींनी कर्मचाऱ्यांना केले. आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याची घोषणा करणारी रिलायंस पहिली कंपनी नाही.
या कंपन्या सुद्धा कर्मचाऱ्यांना मोफत देणार लस
आयटी क्षेत्रातील इतर कंपन्यांपैकी इंफोसिस आणि सॉफ्टवेअर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर या दोन कंपन्यांनी सुद्धा अशा स्वरुपाची घोषणा आधीच केली. या कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा कोरोनाची लस विनामूल्य दिली जाईल. त्यातील काही लोकांनी लसिकरणाचा पहिला डोस देखील घेतला आहे. यासोबतच, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचारी व कुटुंबियांना मोफत लस देत आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील लसिकरण मोहिम
कोरोना लसिकरणाची दुसऱ्या टप्प्यातील मोहिम सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात सध्या ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस त्यांना मोफत दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयातील लसची किंमत 250 रुपये ठेवण्यात आली आहे.