स्थैर्य, मुंबई, दि.२: मागील अनेक
महिन्यांपासून वाढीव वीज बिलाने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिवाळीत खूशखबर
दिली जाईल, असे गाजर राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी दाखवले आहे. वाढीव वीज
बिले माफ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत
यांनी पत्रकार परिषदेत दिली. पहिल्या १०० युनिट पर्यंत वीजबील माफ करण्याचा
निर्णय मोफत देण्याचा शब्द दिला आहे. तो पूर्ण करणार असल्याचे सूचक
वक्तव्यही राऊत यांनी यावेळी केले आहे.
लॉकडाऊन काळात ग्राहकांच्या माथी मोठ्या
रकमेची वीज बिले मारुन सक्तीने त्याची वसुली करण्यात आली. त्यावेळी वीज
ग्राहकाचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना अडचणीत
आणण्याचे काम ठाकरे सरकारने केले. त्यामुळे राज्यभर सरकारच्या विरोधात
संतापाचे वातावरण आहे. ऊर्जामंत्री राऊत मात्र दर आठवड्याला वीज
बिलाबाबतीतील दिलाशाचा चेंडू कधी मुख्यमंत्री, कधी सरकार तर कधी
मंत्रिमंडळाकडे टोलवून वीज ग्राहकाच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहेत. आता
पुन्हा एकदा त्यांनी वाढीव बील माफी संदर्भातील गाजर दाखविले आहे. मुंबईतील
वाढीव वीज बिल कमी करण्यावर बोलताना राऊत म्हणाले, वाढीव वीजबील माफ
करण्यासंदर्भात आम्ही सात वेळा रिपोर्ट पाठवला आहे. त्यासाठी अर्थखात्याला
फाईल दिली आहे, असे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचाच प्रयत्न त्यांनी
केला आहे.
राज ठाकरे यांनी वीज बिलाच्या मुद्यावरून
नुकतीच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर शरद पवारांशीही
संवाद साधला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील वीज
ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतचे वीज बील माफ करण्याचा निश्चय केला होता.
पहिल्या १०० युनिटपर्यंत वीजबील माफ करण्याचा निर्णय मोफत देण्याचा शब्द
दिला आहे. तो पूर्ण करणार असल्याचे आणखी एक गाजरही ऊर्जामंत्र्यांनी
दाखविले आहे.