समग्र शिक्षा समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग लाभार्थीं विद्यार्थ्यांना मोफत फिजिओ, स्पिच थेरेपी – जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | समग्र शिक्षा समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग लाभार्थीं विद्यार्थ्यांना मोफत फिजिओ, स्पिच थेरेपी व शस्त्रक्रिया मुकुल माधव फौंडेशन, पुणे यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.

या संदर्भात जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या झालेल्या बैठकीत श्री. गौडा बोलत होते. या बैठकीला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे, मुकुल फौंडेशनचे प्रतिनिधी व सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई येथील गटशिक्षणाधिकारी, समावेशित विशेष तज्ञ उपस्थित होते.

यावेळी श्री. गौडा म्हणाले, समग्र शिक्षा समवेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण पूर्ण करतांना कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ग्रामीण, निमशहरी भागातील विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा शोध घ्यावा. अशा बालकांची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत  शाळा स्तरावर तपासणी आणि तालुकास्तरीय दिव्यांग  निदान उपचार शिबीरात वैद्यकीय तपासणी करावी. तसेच ज्यांचा फिजिओ व स्पिच थेरपीची गरज आहे अशा मतीमंद, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, कर्णदोष, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असलेल्या विद्यार्थ्यांना गरजेनुसार थेरपीची आवश्यकता असते. अशा विद्यार्थ्यांना अंशत: मोफत थेरपी व शस्त्रक्रिया मुकुल माधव फौंडेशन, पुणे यांच्याकडून करण्यात येणार आहे.

या शिबीरासाठी सर्व समावेशित विशेष तज्ञ यांनी लाभार्थी विद्यार्थींची यादी तयार करावी व संपर्क नंबर घेण्यात यावेत. या शिबीराची माहिती एसएमएसद्वारे पालकांपर्यंत पोहोचविण्यात यावी. या शिबीरामध्ये पुणे येथील 30 डॉक्टरांमार्फत तपासणी होणार आहे. त्यामधील तज्ञ डॉक्टर यांनी शिफारस केलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांना अंशत: मोफत थेरेपी व शस्त्रक्रिया मुकुल माधव फाऊडेंशन, पुणे यांच्याकडून करण्यात येणार आहे,असेही श्री. गौडा यांनी   सांगितले.


Back to top button
Don`t copy text!