
दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । सातारा । भारतविकास परिषदेचा 63 वा स्थापना दिवस आणि सातारा शाखेच्या रजत महोत्सवानिमित्त सातारा शाखेच्या वतीने डॉ. सुधीर जोशी संचलित मोफत निसर्गोपचार सल्ला केंद्राचा प्रारंभ गुरुपौर्णिमेनिमित्त उत्साहात करण्यात आला.
यावेळी भारत विकास परिषदेच्या अध्यक्षा सीमा दाते व विभागीय संयुक्त सचिव गिरीश दोशी, डॉ. सुधीर जोशी यांच्या हस्ते नामफलकाला पुष्पहार घालण्यात आला. भारत विकास परिषदेचे सचिव प्रकाश बडदरे, खजिनदार । गोपाळराव काळे, शाखा संघटक अनिलकाटदरे, मार्गदर्शक सुभाष दोशी, ज्ञानेश्वर गजधरणे, अशोक सूर्यवंशी, माजी सचिव किशोर देशपांडे, शाखा व्यवस्थापक मदन जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुधीर जोशी यांनी निसर्गोपचार विषयावर बोलताना सांगितले, की निसर्गोपचार ही एक उपचार पद्धती आहे जी नैसर्गिक घटकांचा वापर करून शरीराला स्वतःच बरे होण्यास मदत करते. यामध्ये औषधांऐवजी नैसर्गिक साधनांचा जसे, की सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, आहार आणि जीवनशैलीतील बदलांचा उपयोग करून घेतला जातो.
सुभाष दोशी यांनी भारत विकास परिषद पुणे व सातारा शाखेच्या वतीने 27 जुलैला सातारा येथे आयोजित अत्याधुनिक मॉड्युलर मोफत कृत्रिम पाय व हात मोजमाप शिबिराविषयी माहिती दिली.
सीमा दाते यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करून शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अत्याधुनिक मॉड्युलर मोफत कृत्रिम पाय व हात मोजमाप शिबिरामध्ये सर्व गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकात किशोर देशपांडे यांनी भारत विकास परिषदेच्या आरोग्य सर्वसामान्यांसाठी विभागांतर्गत आयोजित मोफत निसर्गोपचार सल्ला केंद्रांचा उद्देश सांगितला. गोपाळराव काळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.