‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभरात मोफत आरोग्य तपासणी; फलटणकरांनाही लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा अभिनव उपक्रम; गणेश मंडळांच्या सहकार्याने शिबिरांचे आयोजन


स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्ह्यात आणि फलटण तालुक्यातही विविध गणेश मंडळांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात, गणेश मंडळांच्या मंडपात किंवा जवळच्या परिसरात आरोग्य शिबिरे उभारली जातील. या शिबिरांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

या शिबिरांचा उद्देश केवळ तपासणीपुरता मर्यादित नाही, तर नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे. तपासणी दरम्यान नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली जाईल. एखाद्या व्यक्तीला आजाराचे निदान झाल्यास, त्याला संबंधित योजनेअंतर्गत पुढील मोफत उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाईल. यातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे.

हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेचा एक उत्तम लोकाभिमुख आदर्श आहे. या माध्यमातून हजारो नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचारांची संधी मिळत असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांनी सांगितले. फलटण तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या भागातील गणेश मंडळांशी संपर्क साधून या आरोग्य शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!