दैनिक स्थैर्य । दि. १३ मार्च २०२२ । फलटण । भारताचे माजी उप पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी, श्रीराम एज्युकेशन सोसायटी मानद सचिव, डॉ. सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीराम एज्युकेशन सोसायटी, आर्यमान फौंडेशन व फलटण तालुका कॉंग्रेस कमिटी यांच्या संयुक्त सहभागाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात शहर व तालुक्यात ५ ठिकाणी करण्यात आले सर्व ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतल्याचे फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके यांनी सांगितले.
शहरातील स्व. यशवंतराव चव्हाण व सौ. वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले, त्यानंतर यशवंतराव चव्हाण हायस्कुल, फलटण येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी पदाधिकारी, काँग्रेस पदाधिकारी, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्व. चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, अनको लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे (सातारा), डॉ. मनोहर डोळे मेडिकल फौंडेशन नारायणगाव यांच्या सहकार्याने हृदयविकार, मेंदू विकार, बायपास हृदय शस्त्रक्रिया, मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया, मशीनद्वारे कॅन्सर (कर्करोग) तपासणी, अंजिओग्राफी, अंजिओप्लास्टी, फिट, अर्धांगवायू, डोकेदुखी, चक्कर, स्नायूंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मूळव्याध, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, पोटाच्या व इतर शस्त्रक्रिया यासाठी शनिवार दि. १२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत श्रीराम मंदिर लगत श्रीमंत मालोजीराजे प्रा. विद्या मंदिर, फलटण येथे सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, तर डॉ. मनोहर डोळे फौंडेशन, नारायणगाव यांच्या माध्यमातून तरडगाव, सासवड, विडणी, गुणवरे, गिरवी या ५ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोती बिंदू नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी सांगितले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत मालोजीराजे प्रा. विद्या मंदिर, फलटण येथे सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या माध्यमातून दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ३८७ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ५३ नेत्र रुग्णांना मोती बिंदू नेत्र शस्त्रक्रियेची गरज स्पष्ट झाल्यानंतर त्यांना टप्याटप्याने मिरज येथे पाठवून नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी सांगितले.
तसेच या शिबीरात विविध आजारांच्या १६७ रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार मोफत करण्यात आले, त्याचप्रमाणे अनको लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे (सातारा) यांच्या माध्यमातून १३९ रुग्णांची तपासणी करण्यात आली असल्याचे शहर काँग्रेस अध्यक्ष पंकज पवार सर यांनी सांगितले.
दि. ७ ते १२ मार्च दरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत वरील ५ ठिकाणी नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, तपासणीत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची जरुरी असणाऱ्या नेत्र रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष अमिरभाई शेख व उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे यांनी सांगितले. मोफत नेत्र तपासणी शिबीर सोमवार ७ मार्च रोजी सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव येथे संपन्न झाले तेथे २२५ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली, १८ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. मंगळवार दि. ८ मार्च रोजी प्रा. आरोग्य केंद्र विडणी येथे संपन्न झाले तेथे १३० नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली, २७ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. बुधवार दि. ९ मार्च रोजी महात्मा फुले हायस्कूल सासवड येथे संपन्न झाले. तेथे १०५ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली, २१ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. शुक्रवार दि. ११ मार्च रोजी प्रा. आरोग्य केंद्र गुणवरे येथे संपन्न झाले. तेथे १२९ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली, २७ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. शनिवार दि. १२ मार्च रोजी प्रा. आरोग्य केंद्र गिरवी येथे संपन्न झाले. तेथे ११८ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली, १७ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले असून मोफत मोती बिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांना नारायणगाव येथे फाऊंडेशनच्या वाहनाने घेऊन जाऊन शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्यांच्या गावात पोहोच करण्यात येत असल्याचे महेंद्र सुर्यवंशी बेडके यांनी निदर्शनास आणून दिले आहे.