प्रभाग ८ मधील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजने’ची मोफत ई-केवायसी सुविधा; सिद्धाली शहा यांचे आवाहन


स्थैर्य, फलटण, दि. 11 नोव्हेंबर : फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजने’ची ई-केवायसी मोफत करून देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात ही सेवा दिली जात असून, प्रभागातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुमारी सिद्धाली अनुप शहा यांनी केले आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्धाली शहा यांनी यावेळी सांगितले.

प्रभाग क्रमांक ८ चा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या एका हाकेला धावून जात कामकाज करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीअभावी हे करणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन अनुप शहा यांच्या कार्यालयात मोफत ई-केवायसी सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या सुविधेमुळे प्रभागातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुलभ झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. सिद्धाली शहा यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

प्रभागातील विकासकामांसोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही सिद्धाली शहा यांचा सक्रिय सहभाग असतो. नागरिकांच्या थेट संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यावर त्यांचा भर असतो. आगामी काळात अशाच प्रकारचे आणखी जनहिताचे उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!