सातार्‍यात दोन ऑगस्टला मोफत बालनाट्य शिबिर

बालरंगभूमी परिषदेच्या सातारा शाखेचा उपक्रम


दैनिक स्थैर्य । 2 ऑगस्ट 2025 । सातारा। मराठी बालनाट्य दिवसानिमित्त बालरंगभूमी परिषद सातारा शाखेतर्फे मोफत बालनाट्य शिबिराचे आयोजन दोन ऑगस्टला करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषद सातारा शाखेचे अध्यक्ष डॉ. नीलेश माने यांनी दिली. हा उपक्रम गुरुवार बागेसमोरील केसकर वाडा येथे आयोजित केला आहे.

संपूर्ण देशात मराठी बालरंगभूमीची समृद्ध परंपरा असून, मराठी बालनाट्यालाही 66 वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी बालनाट्यांचे सर्वात जास्त प्रयोग राज्यात होत असतात. दोन ऑगस्ट 1959 रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला म्हणून बालरंगभूमी परिषदेतर्फे दोन ऑगस्टहा ’मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याचे डॉ. माने यांनी नमूद केले.

बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था असून, या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मराठी बालनाट्य दिवसानिमित्त मुख्य शाखा अध्यक्ष नीलम शिर्के-सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार बागेसमोरील केसकर वाडा येथे आयोजिलेल्या उपक्रमाचा शहरातील बालकलावंतांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद सातारा शाखेचे उपाध्यक्ष रसिका केसकर यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!