दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | बारामती |
ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशन, हेल्प एज इंडिया व एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि.२८/१२/२०२३ रोजी श्री संत सावतामाळी महाराज मंदिर नेवसेवस्ती, पाडेगाव या ठिकाणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळ्यांच्या इतर आजारासंदर्भात अचूक निदान व उपचार शिबीर उत्साहात पार पडले.
सदर शिबिरात रुग्णांची रक्तदाब व साखरेची पातळी चाचणी पाडेगाव आरोग्य उपकेंद्रातर्फे डॉ. समर्थ कस्सा व त्यांच्या टीम मार्फत करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन सकाळी पाडेगावचे प्रथम नागरिक श्री. राहुल कोकरे यांच्या हस्ते फित कापत सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय जाधव, युवा नेते श्री. नितीन जगताप, मानवाधिकार कार्यकर्ते श्री. प्रशांत ढावरे, श्री आबासाहेब मोरे, श्री. नरेश गायकवाड, श्री. चंद्रकांत गोरे, श्री. प्रभाकर नेवसे, श्री. बापूराव नेवसे, पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. गिरीश बनकर व एच. व्ही. देसाई रुग्णालय नेत्र चिकित्सक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शिबिरास गावातील व गावाबाहेरील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला. यामध्ये तब्बल ९४ रुग्णांची डोळे तपासणी करून काहींना नंबरचे चष्मे अल्पदरात देण्यात आले. तर उपचारार्थी काही रुग्णांना औषधांचा पुरवठा हा पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशन मार्फत मोफत करण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास १४ रुग्ण हे तात्काळ पुण्याला पाठवण्यात आले.
सदर शिबिराच्या आयोजनासाठी व शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशनचे कार्यकर्ते श्री. महेश ढावरे, श्री. सनी रायकर, श्री. संदेश नेवसे, श्री. किरण गोरे, श्री. रोहित नेवसे, श्री. विशाल ढेकळे यांनी नियोजन व्यवस्थेसंदर्भात बहुमूल्य योगदान दिले. त्याबद्दल पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशनच्या वतीने श्री. गिरीश बनकर यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच एच. व्ही. देसाई हॉस्पिटल स्टाफ, पाडेगावचे सजग नागरिक श्री. विनोद भुजबळ यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर, पाडेगाव आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी स्टाफ आणि शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांचे स्वागत व आभार व्यक्त केले.