दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । उंब्रज । साखरेचे कार्ड काढून देतो असे सांगून पॅनकार्ड व आधारकार्ड घेऊन किसन उर्फ कृष्णा गणू पोळ (वय ९२) रा. शामगाव ता. कराड यांची ६ एकर १० गुंठे जमीन उंब्रज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात फसवणूक करून खरेदी खत करून घेतलेल्या गावातील दोघा जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने सपोनि अजय गोरड यांनी संशियतांना रविवार दि. ५ डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक केली.
रमेश शंकर पोळ (वय ३२) व शंकर बाजीराव पोळ (वय ५९) दोघे रा. रा. शामगांव ता. कराड जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत किसन ऊर्फ कृष्णा गणु पोळ (वय ९२) रा. शामगांव ता. कराड यांनी सदर फसवणुकी बाबत दि. १९ जुलै रोजी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फसवणूकीप्रकरणी दोघा जणांना उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि अजय गोरड यांनी अटक केली आहे. अधिक तपास सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस करत आहेत.