
दैनिक स्थैर्य । 18 मार्च 2025। सातारा । नागरिक हा जन्मापासून ते मृत्यनंतरही ग्राहक असतो. ग्राहकांच्या हितासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत. या तरतुदींचा ग्राहकांनी अभ्यास करुन याची माहिती समाजात, मित्रांमध्ये व नागरिकांमध्ये दिल्यास फसवणुकीला आळा बसेल, असा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील बोलत होते. या प्रसंगी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा भारती सोळवंडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष विलास लेले, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध गावांचे सरपंच व पोलीस पाटील उपस्थित होते.
ग्राहकांना घटनेने व कायद्याने विविध जबाबदार्या दिल्या आहेत त्या पार पाडाव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, ग्राहकांनी जागृतपणे मालाची खरेदी केल्यास फसवणूक होत नाही. ग्राहकांसाठी असणार्या कायद्याची प्रगल्भता सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे. कायद्याचा धाक निर्माण झाला तर फसवणुकीचे प्रमाणही कमी होऊ शकते यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनीही कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
ग्राहकांसाठी कायदा 1986 साली अस्तीत्वात आला. यामध्ये ग्राहकांच्या हिताचेि निर्णय घेण्यात आले आहेत. बदलत्या काळानुसार ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे. या खरेदीवरही अलीकडे कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. नुकसानीच्या जाहिरांतीवरही तक्रार नोंदवू शकता. ग्राहकांसाठी असणारा कायदा सोपा व सुट सुटीत असा आहे. त्याचा ग्राहकांनी वापर करावा, असे आवाहनही जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती सोळवंडे यांनी केले.
ग्राहकांसाठी असणारा कायदा उत्तम व चांगल्या दर्जाचा आहे. ग्राहकांची फसवणुक झाल्यास त्यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार द्यावी. वकील देण्याची सुद्धा आवश्यकता नाही आपली बाजु आपण मांडू शकता. ग्राहक न्यायालकडून खात्रीशीर निकाल दिला जातो, असे अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विलास लेले यांनी सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने यांनी प्रास्ताविक केले.