
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । एम.आय.डी.सी. येथे असणार्या युटोपीया कंपनीची बनावट कागदपत्रे बनवून कंपनीची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या सामुगीची चोरी करून नियमांचा भंग केल्याने 18 जणांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी प्रसन्न आनंदराव देशमुख (वय 48 रा. आर्मी ऑफिस कॉलनी सदरबझार) यांनी 1997 मध्ये युटोपीया ऑटोमिशन कंपनीची स्थापना केली. सन 2007 व 08 मध्ये प्रसन्न यांच्यासोबत जुनी ओळख असणारे अविनाश साखळकर यांची भेट झाली. कंपनीच्या पर्चेसचा अनुभव चांगला आहे, असे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर गौरी देशमुख, महेश साखळकर, संदीप बोरसे हे कंपनीचे कामकाज पाहू लागले. यावेळी औषध बनवणार्या कंपन्यांना लागणार्या मशीन व मशीनचे सुट्टे भाग बनविण्याचे काम सुरू केले. या कामात संशयित महेश साखळकर, तन्मय रणसिंग, अनिरूद्ध देसाई, अभय सपाटे, तुषार कदम, समीर वाघ, नितीन चिकुर्डे, अनिकेत बोबडे, धनजंय कुलकर्णी, सुनंदा कुलकणी, देवदत्त काणे, सार्थक पालकर, राहूल गोलवीकर, किरण पालकर, जागृती साखळकर, शुभम यादव, विकास मोरे, दिनेश फलक व इतर कर्मचारी यांनी संगमताने बनावट कागदपत्रे बनवली. आणि कंपनीची वेळोवेळी 13 कोटी 64 लाख 71 हजार 876 ची आर्थिक फसवणूक केली. तसेच कंपनीच्या सामुग्रीची चोरी केली आहे.
कंपनीने घालुन दिलेल्या नियमांचा भंग केला आहे. यामुळे यांच्या विरूद्ध प्रसन्न देशमुख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.