बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक; गोरेंचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला…!!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । सातारा । येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनसाठीची सुनावणी वडूज ऐवजी अन्य न्यायालयात घ्यावी. यासाठी आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सोमवारी (ता. २) सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्‍तिवाद झाल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांनी गोरेंचा अर्ज फेटाळला. त्यामुळे जामीन अर्जावरील आता वडूज येथील न्यायालयातच सुनावणी होणार आहे.

त्याबाबत माहिती अशी, मायणी येथील भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले. भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यांचेवर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, फसवणुक प्रकरणी भिसे यांचे नावाने सह्या करणाऱ्या संजय काटकरला पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, जयकुमार गोरे यांच्यावतीने त्यांचे वकील संदेश गुंडगे यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांसमोर अर्ज सादर करून अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाऐवजी इतरत्र घेण्याची मागणी केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत आ. गोरेंचे वकील संदेश गुंडगे, जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी आणि फिर्यादीचे वकील टी. एस. माळी यांनी युक्‍तिवाद केला.


Back to top button
Don`t copy text!