लॉकडाऊनच्या काळात बांधकाम कामगारांना मिळाले प्रत्येकी दोन हजार रुपये
स्थैर्य, सोलापूर, दि.20 : लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्यामुळे बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांचा उदरनिवार्हाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने त्यांच्याकडे नोंद असलेल्या तसेच नूतनीकरण केलेल्या व सक्रिय असलेल्या कामगारांना दोन हजार रुपयाची मदत जाहीर केली. याचा लाभ जिल्ह्यातील 71904 कामगारांना मिळाला असून त्यांच्या खात्यात 14 कोटी 38 लाख रुपये थेट जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी दिली.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु केले आहे. लॉकडाऊनच्या काळात उद्योग, व्यवसाय, व्यापार, बांधकाम, वाहतुक व्यवस्था इत्यादी बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. बांधकाम कामगारांचा प्रश्न पुढे येताच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने कामगारांना मदतीचा हात दिला.
सहाय्यक कामगार आयुक्त यांचे अधिपत्याखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे वतीने बांधकाम क्षेत्रातील विविध 21 प्रकारच्या कामगारांची नोंदणी करण्यात येते. यामध्ये 1) दगड फोडणे, कापणे,दगडाचा बारीक चुरा करणे, 2) लादी किंवा टाइल्स कापणे व पॉलिश करणे 3) रंग, वॉर्निश लावणे सुतार काम 4) गटार व नळ जोडणी ची कामे 5) वायरिंग,वितरण तावदान बसविणे विद्युत कामे 6) अग्निशमन यंत्रणा व दुरुस्तीची कामे 7) वातानुकुलित यंत्रणा बसविणे व दुरुस्ती करणे 8) उदवाहने, स्वयंचलित जिने 9 )सुरक्षा दरवाजे उपकरणे लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रिल्स खिडक्या दरवाजे तयार करणे 10)जल संचयन संरचनेचे बांधकाम 11) सुतारकाम, आभासी छत, प्रकाश व्यवस्था प्लास्टर ऑफ पॅरिस व सजावटीची कामे 12) काच कापणे, लावणे, काचेची तावदाने बसविणे 13) सौर तावदाणे व ऊर्जाक्षम उपकरणे बसविणे 14) स्वयंपाक खोली सारख्या ठिकाणी मॉड्यूलर किचन युनिट ची कामे 15) सिमेंट काँक्रीटच्या वस्तू तयार करणे 16) जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादी खेळाच्या व मनोरंजनाच्या सुविधांची कामे 17) माहितीफलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे किंवा बसस्थानके 18) सिग्नल यंत्रणा इत्यादी उभारणे 19) रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजी बसविणे 20) सार्वजनिक उद्याने, रमणीय भूप्रदेश तयार करणे 21) विटा, छपरावरील कौल इत्यादी तयार करणे अशा 21 क्षेत्रातील कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यात येते.
कामगाराच्या कल्याणासाठी सुमारे 29 विविध कल्याणकारी योजना मंडळाकडून राबविण्यात येतात.
यामध्ये कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, कामगारांचा मृत्यु झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा 29 योजनाचा समावेश आहे.
जिल्ह्यात 31 मार्च अखेर 21 क्षेत्रातील एक लाख 14 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून 88601 बांधकाम कामगारांचे नूतणीकरण केले आहे . या सक्रिय कामगारांच्या यादीची तपासणी करून महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आली. मुंबई येथे यादीतील कामगारांच्या बँक खात्याची पडताळणी करुन अचूक खाते क्रमांक असलेल्या 71904 बांधकाम कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. उर्वरित बांधकाम कामगारांचे चुकीचे बँक खाते क्रमांक तपासून पुन्हा दुरुस्ती करून पाठविण्यात येत असल्याचे श्री. येलगुंडे यांनी सांगितले.