सातार्‍यात अग्निवीर भरतीत चार हजार जण उत्तीर्ण

गुणवत्ता यादीनुसार मुलाखती होणार; युवकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री राबविली प्रक्रिया


स्थैर्य, सातारा, दि. 4 डिसेंबर : येथीलछत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल व पोलिस कवायत मैदानावर गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेली सैन्य दलाची अग्निवीर भरती प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये एकूण चार हजार अग्निवीर उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यामध्ये सैन्य दलाची भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षापासून झाली नव्हती. कोरोना कालावधीमुळे ही प्रक्रियेस आणखी वेळ लागला; परंतु या वर्षी जिल्ह्यामध्ये सैन्य भरतीला संधी मिळाली. 15 नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये सैन्य दलाने येथील छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल व पोलिस कवायत मैदान ताब्यात घेतले होते. युवकांना त्रास होऊ नये, यासाठी या दोन्ही मैदानांवर रात्री बारापासून ही भरती प्रक्रिया राबविली जात होती.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नल प्रशांत सिंग (डायरेक्टर आर्मीरीक्रूटिंग ऑफिसर, कोल्हापूर), प्रांताधिकारी आशिष बारकुल व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांनी अग्निवीर सैन्य भरती अतिशय चांगल्याप्रकारे यशस्वी पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.

30 नोव्हेंबरपर्यंत चाललेल्या या भरती प्रक्रियांमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या राज्यातील जिल्ह्यांबरोबर उत्तर गोवा येथील नऊ हजार युवक भरती प्रक्रियेत सहभागी होते. भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवकांना मैदानी चाचणी व वैद्यकीय तपासणीसाठी कॉल लेटरद्वारे बोलविण्यात आले होते. एकूण भरती प्रक्रियेमध्ये नऊ हजार युवकापैकी चार हजार युवक सैनिक शारीरिक व वैद्यकीय चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर अंतिम निवड प्रक्रिया आर्मी रीक्रूटिंग ऑफिस, कोल्हापूर यांच्याकडून राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र ठरणार्‍या उमेदवारांना मेरिटप्रमाणे कॉल लेटरद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या आर्मी रीक्रूटिंग ऑफिसचे डायरेक्टर कर्नल प्रशांत सिंग यांनी कळविले

पंधरा दिवस होणार्‍या या भरतीसाठी सैन्य दलाने शहरातील महत्त्वाची अशी दोन्ही मैदाने ताब्यात घेतली होती. या दोन्ही मैदानावरच शहरातील बहुतांश खेळाडूंचा दररोजचा सराव होत असतो. भरती प्रक्रियेमुळे खेळाडूंच्या सरावाचे काय होणार? असा प्रश्न होता; परंतु कर्नल प्रशांत सिंग यांनी सातार्‍यातील खेळाडूंची अडचण होऊ दिली नाही. आवश्यक तेवढीच जागा ताब्यात घेत त्यांनी खेळाडूंसाठी मैदानाचा बहुतांश भाग खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे सातार्‍यातील खेळाडूंची कोणतीही अडचण झाली नाही.


Back to top button
Don`t copy text!