दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । फलटण । महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र सासकल याठिकाणी उपकेंद्रातील नियंत्रण कक्षात घुसून वीज उपकेंद्र बंद पाडत,वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याच्या धमकी दिल्याच्या तसेच वीज वितरण कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून सासकल येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सासकल येथील वीज उपकेंद्रामध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कनिष्ठ यंत्र चालक संतोष लक्ष्मण क्षीरसागर व त्यांच्यासह कर्मचारी ज्ञानेश्वर सुदामराव डाकोरे हे काम करत होते.त्यांना फलटण १३२ केव्ही उपकेंद्रातून सासकल वीज उपकेंद्र नियंत्रण कक्ष मोबाइलवर कृषी वीज वाहिनी फोर्स लोड शेडिंग करण्याबाबत मेसेज आल्याने क्षीरसागर यांनी वडले व दुधेभावी कृषी वीज वाहिन्यांचे लोड शेडिंग केले.त्यावेळी सासकल गावातील बाबुराव अर्थात निलेश मानसिंग मुळीक, राजेंद्र मुगुटराव धुमाळ, गणेश ज्ञानदेव मुळीक, अमित विष्णू मुळीक, हे तिथे आले व क्षीरसागर व सहकारी कर्मचाऱ्यांना आमची स्कूल कृषी वीज वाहिनी सुरू करा असे म्हणत त्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणला.त्याचबरोबर सासकल वीज उपकेंद्र बंद पाडण्यास भाग पाडले.यामधील अमित विष्णू मुळीक याने कंट्रोल पॅनल बंद केल्याने तीन तास वीजपुरवठा बंद झाला.त्यामुळे तालुक्यातील १७ गावांचा वीजपुरवठा बंद राहिल्याने महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत या कारणावरून चौघांविरूध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात घेण्यात आलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद संतोष लक्ष्मण क्षीरसागर यांनी दिली आहे.याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.