जेम्स लेन प्रकरणी चौघांनी मागितली श्री. छ. उदयनराजेंची माफी


स्थैर्य, 6 जानेवारी, सातारा : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने 2003 साली जेम्स लेन यांनी लिहिलेली शिवाजी: द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकातील काही परिच्छेद व उतारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारे आणि अपमानास्पद होते. या विरोधात खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील न्यायाधीश दंडाधिकारी समोर फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये ‘शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आरोपींविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अपमान केल्याचा आरोप होता.

या प्रकरणी मुख्य न्यायाधीश दंडाधिकार्‍यांनी तक्रार व पुस्तकातील संपूर्ण मजकूर विचारात घेऊन दिनांक 2/04/2005 रोजी सर्व आरोपींविरुद्ध प्रक्रिया जारी करण्याचा आदेश दिला. हा आदेश जाहीर झाल्यानंतर आरोपी- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे संपादक सैयद मंझर खान, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संस्कृत विषयाचे प्राध्यापक, डॉ. श्रीकांत बहुळेकर, सुश्री सुचेता परांजपे, भांडारकर संस्थेचे ग्रंथपाल श्री. व्ही. एल. मंजूळ यांनी उच्च न्यायालयात दंडविषयक रिट याचिका दाखल केली होती. या आरोपीनी दाखल केलेल्या रिट याचिका आणि दंडविषयक अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित होत्या.

या रिट याचिका दिनांक 17/12/2025 रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट पीठासमोर, न्यायमूर्ती सी. दिगे शिवकुमार यांच्या समोर यादीत होत्या. दिनांक 17/12/2025 रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्ते/अर्जदार/आरोपी व्यक्तींच्या वकिलांनी न्यायालयात त्यांचे म्हणणे सादर केले. त्यामध्येअसे म्हटले आहे, तक्रारदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांची माफी मागण्यास तयार आहेत. याविषयीचे माफीपत्र मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केले जाईल.

या माफीपत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2003 साली जेम्स विल्यम लेन यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित केले होते. मी या गोष्टीची जाणीव आहे की, श्री. छ. शिवाजी महाराज यांच्या विषयी लाखो लोकांच्या हृदयात एक सन्मानाचे आणि अगाध स्थान आहे. त्यांच्या वारशाशी निगडित तीव्र सार्वजनिक भावनांचा सखोल आदर करतो. सामान्य जनतेला झालेल्या कोणत्याही दुःखाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तसेच श्री. छ. उदयनराजे भोसले यांना झालेल्या त्रासाबद्दल, वेदनेबद्दल मी माझी बिनशर्त माफी मागतो.

श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधित्व अ‍ॅड. शैलेष धनंजय चव्हाण, अ‍ॅड. रणजित पाटील, सुजित निकम आणि धवलसिंह पाटील यांनी केले होते. योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दिनांक 17/12/2025 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. एस. सी. दिगे यांनी याचिकाकर्त्यांना 15 दिवसांच्या आत राष्ट्रीय स्तरावर विस्तृत प्रसारण असलेल्या वृत्तपत्रांमध्ये माफी प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते.


Back to top button
Don`t copy text!